गणपती बाप्पाची मनोभावी पूजा केल्यानंतर त्यांना निरोप देण्याची वेळ दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील ९७३ सार्वजनिक गणपती मंडळ आपल्या गणपती बाप्पांना निरोप देणार आहेत. यावेळी मोठ्या उत्साहात गणपती मंडळ मिरवणुका काढणार आहेत. या उत्सवात काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात वेगवेगळ्या गणपती विसर्जन घाटांवर चोख पोलीस बंदोबस्त असणार आहे. गणपती विसर्जनाच्या दिवशी सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिली आहे.
गणपती विसर्जनासाठी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त असून शहरातील ऐकून ९७३ सार्वजनिक गणपती मंडळ बाप्पाचं विसर्जन करणार आहेत. यावर्षी थेरगाव घाट, पिंपरी घाट अश्या वेगवेगळ्या गणपती विसर्जन घाटावर पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. यात बाहेरून आलेल्या ०५ वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ३० पोलीस उपनिरीक्षक, १५ सहायक पोलिस निरीक्षक, १ हजार होमगार्ड, एस.आर.पी.एफ ची एक कंपनी तर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील जवळपास २ हजार ५०० पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी आणि अधिकारी गणपती विसर्जनाच्या वेळी तैनात असणार आहेत. याचबरोबर पोलीस मित्र आणि नागरीक पोलीस पोलीस मित्र असे मिळवून २५० जण नागरिकांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरणार आहेत. गणपती उत्सव हा शांततेत, चांगल्या प्रकारे साजरा होईल. मंडळांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि शिस्तबद्ध मिरवणुका असाव्यात असे आवाहन अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी केले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 10, 2019 3:19 pm