पिंपरी-चिंचवड शहरातील महत्त्वाचे प्रश्न जैसे थे आहेत. भाजपचे स्थानिक नेते व महापालिका पदाधिकारी हे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुढाकार घेऊन हे प्रश्न सोडवावेत, अशी पक्ष कार्यकर्त्यांची तसेच शहरवासियांची अपेक्षा आहे. तूर्त, केवळ आश्वासनांशिवाय काहीच पदरात पडत नाही, अशी परिस्थिती आहे.

पुण्याचे पालकमंत्री असूनही गिरीश बापट पिंपरी-चिंचवड शहरात फिरकत नाहीत, त्यांना या शहराविषयी आपुलकी नाही, तर  अ‍ॅलर्जी आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसने अलीकडे सुरू केली होती, त्याचा परिणाम म्हणून की काय, बापट यांनी सलग दोन दिवस शहरात हजेरी लावली. पहिल्या दिवशी महापालिका कामगारांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशा कर्मचारी महासंघाच्या कार्यक्रमास ते उपस्थित राहिले. दुसऱ्या दिवशी, चिंचवड एम्पायर इस्टेट येथील उड्डाण पुलाचे उद्घाटन त्यांनी केले. यावेळी पत्रकारांशी झालेल्या संवादाच्या माध्यमातून त्यांनी यापूर्वीच दिलेली आश्वासने पुन्हा शहरवासियांना दिली.

पिंपरी-चिंचवडकरांसाठी महत्त्वपूर्ण असा पवना थेट जलवाहिनीचा प्रकल्प अजूनही मार्गी लागलेला नाही. राज्यात भाजपची सत्ता येऊन चार वर्षे झाली. मावळ आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे आमदार आहेत. तरीही प्रकल्पाचा तिढा सुटत नसल्याने या संदर्भातील टीकेला भाजपला सातत्याने सामोरे जावे लागते. मावळातील शेतकऱ्यांसमवेत सकारात्मक चर्चा सुरू असून लवकरच हा प्रश्न सुटेल, असे साचेबद्ध उत्तर पालकमंत्र्यांनी दिले आहे.

बेकायदा बांधकामांना लावण्यात येणारा शास्तीकराचा (दंडाची रक्कम) महत्त्वपूर्ण विषय अद्याप सुटू शकलेला नाही. हजारो नागरिकांचा जीव टांगणीला लागला असताना आणि विरोधकांनी हाच प्रश्न पेटता ठेवला असताना केवळ ‘कागदी घोडे’ नाचवण्याचे काम सुरू असल्याची भावना खुद्द भाजप वर्तुळात आहे. या संदर्भात, बैठक लावू, असे आश्वासन बापटांनी दिले आहे.

पोलीस आयुक्तालय एक मे रोजी सुरू करण्यात येणार होते. याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला, तेव्हा याचे श्रेय घेण्यासाठी बापट सर्वाधिक आघाडीवर होते. प्रत्यक्षात, आयुक्तालय सुरू झाले नसून त्याचा संथ प्रवास सुरूच आहे. आयुक्तालयासाठी आवश्यक जागेकरिता शोध सुरू असून पुढील आठवडय़ात लोकप्रतिनिधींशी चर्चा करणार असल्याचे बापट यांनी म्हटले आहे.

महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन िझजुर्डे यांनी नोकरभरतीसह अनेक महत्त्वाचे विषय पालकमंत्र्यांपुढे मांडले. तेव्हा त्यांना स्वतंत्र बैठक लावू, असे आश्वासन देण्यात आले आहे. एकाच भागात दोन प्राधिकरण नको म्हणून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये (पीएमआरडीए) पिंपरी प्राधिकरणाचे विलिनीकरण करण्याचा मुद्दा पालकमंत्र्यांनी मांडला आणि भाजपमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे. निगडीपर्यंत मेट्रो नेण्यासाठी स्थानिक नेते आग्रही होते, तेव्हा बापट यांनी निगडी नव्हे तर पिंपरीपर्यंतच मेट्रो जाईल, असे स्पष्ट केले होते, त्याचीच पुनरावृत्ती प्राधिकरण विलिनीकरणाच्या बाबतीत दिसून येते.

हल्लाबोल की मांडवली

पिंपरी महापालिकेतील नियोजित विरोधी पक्षनेते दत्ता साने हे राष्ट्रवादीचे धडाडीचे नगरसेवक म्हणून ओळखले जातात. महापालिकेवर तिसऱ्यांदा निवडून आलेले साने यंदाच्या पंचवार्षिकमध्ये पहिल्या वर्षांतच विरोधी पक्षनेते होण्यासाठी आग्रही होते. तथापि, ज्येष्ठतेच्या मुद्दय़ावर योगेश बहल यांची वर्णी लागली. संधी न मिळाल्याने संतापलेल्या साने यांनी बराच थयथयाट केला होता. साने यांचा आक्रमकपणा राष्ट्रवादीच्या दृष्टीने वेळोवेळी डोकेदुखीचा विषय ठरला आहे. साने यांच्या राजकीय प्रवासात पक्षनेतृत्वाला पटणार नाही, अशी भूमिका त्यांनी अनेकदा घेतली आहे. भोसरी विधानसभेसाठी विलास लांडे राष्ट्रवादीचे उमेदवार होते, तेव्हा त्यांच्या विरोधात पक्षातूनच पहिली तोफ डागण्याचे काम साने यांनी केले, त्यामुळे लपून-छपून काम करणारे लांडेविरोधक एकत्र आले. त्याचा थेट फायदा महेश लांडगे यांना झाला होता. मात्र, अल्पावधीतच, महेश लांडगे यांना आमदार करण्यात मदत करणे ही आपली घोडचूक झाल्याची उपरती साने यांना झाली. महापालिका निवडणुकीपासून साने यांनी लांडे यांच्याशी जुळवून घेतले. त्यांच्यातील ही तडजोड तात्पुरती आणि दिखाऊ स्वरूपाची आहे. गेली अनेक वर्षे आमदार होण्याची साने यांची महत्त्वकांक्षा लपून राहिलेली नाही. यंदा लढायचेच आहे, असा निर्धार असल्याने साने कोणाचेही ऐकतील, असे वाटत नाही. लांडे राष्ट्रवादीत कायम राहिल्यास साने यांना उमेदवारीसाठी त्यांच्याशीच स्पर्धा करावी लागणार आहे. मोक्याच्या क्षणी दोघांपैकी कोणीही राष्ट्रवादी सोडून दुसऱ्या पक्षाशी सोयरीक करू शकतो. तूर्त साने यांना विधानसभा उमेदवारीच्या तयारीसाठी राष्ट्रवादीने चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे. विरोधी पक्षनेतेपदावर बहल यांनी भाजपशी दोन हात करण्याऐवजी तडजोडीचे राजकारण केले. त्यामुळे भाजपने गैरकारभाराचा कहर केला असतानाही राष्ट्रवादीकडून अपेक्षित प्रत्युत्तर दिले गेले नाही. अजित पवार राज्यभर भाजप सरकारच्या विरोधात हल्लाबोल करत फिरत होते, तेव्हा त्यांच्याच पूर्वाश्रमीच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी नेत्यांनी भाजपच्या मदतीने खाबुगिरीचा पारंपरिक कारभार कायम ठेवला होता, असे उघडपणे बोलले जाते. साने यांच्याकडून राष्ट्रवादीला खूप अपेक्षा आहेत, त्याची पूर्तता ते करणार की बहल यांच्याच पावलावर पाऊल टाकून सोयीचे राजकारण करणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

balasaheb.javalkar@expressindia.com