पत्नीला माहेरी पाठवल्याच्या रागातून रेल्वे पोलीस दलात कार्यरत असलेल्या मेहुणीवर कुऱ्हाडीने वार केल्याची घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास पिंपरी-चिंचवडमधील चिखली परिसरात घडली. याप्रकरणी जखमी सिंधू कुंडलिक मोहिते (वय- २६) यांनी चिखली पोलिसांना फिर्याद दिली आहे. त्यानंतर आरोपी विनोद हिरामण चव्हाण (वय-३५) यांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपी हा फरार झाला असून त्याचा शोध चिखली पोलीस घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी रेल्वे पोलीस कर्मचारी सिंधू मोहिते या पुणे रेल्वे पोलिसात कार्यरत आहेत. दरम्यान, देहूगाव येथील येलवाडी येथे त्यांची बहीण मुक्ता राहाते त्यांच्या घरी सिंधू गेल्या होत्या तेव्हा बहिणीला मारहाण केल्याचा व्रण त्यांच्या अंगावर असल्याचे सिंधू यांना दिसले. त्यामुळे बहीण मुक्ता हिला त्यांच्या मूळ गावी पाठवले होते. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिली आहे.

बायकोला माहेरी पाठवल्याचा राग मनात धरून आरोपी विनोद हिरामण चव्हाण याने सायंकाळच्या सुमारास चिखली येथील कृष्णा नगर पोलीस लाईन येथे राहात असलेल्या सिंधू यांच्या घरी पोहचला. त्यांच्यात अगोदर शाब्दिक बाचाबाची झाली. पत्नीला माहेरी पाठवल्याचा रागातून रेनकोटमध्ये लपवून आणलेल्या कुऱ्हाडीने डोक्यात, उजव्या हातावर, मानेवर वार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेप्रकरणी त्यांनी स्वतः फिर्याद दिली असून फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. सिंधू या घरात एकट्याच होत्या, त्यांचे पती आणि लहान मुलगी बाहेर गावी गेले होते असे पोलिसांनी सांगितले. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एस.एस.उबाळे करत आहेत.