राष्ट्रवादीचा दारूण पराभव, अपक्ष व मनसेचे भाजपला मतदान, शिवसेना तटस्थ

पिंपरी-चिंचवड महापौरपदाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे सत्तारूढ भाजपचे उमेदवार राहुल जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विनोद नढे यांचा ४७ मतांनी पराभव केला. उपमहापौरपदी भाजपचे सचिन चिंचवडे हे राष्ट्रवादीच्या विनया तापकीर यांच्याविरूद्ध तितक्याच फरकाने निवडून आले. अपक्ष व मनसेने भाजपच्या पारडय़ात मते टाकली. तर, शिवसेनेने तटस्थ राहण्याचे धोरण स्वीकारले.

पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीत सुरूवातीला माघारीसाठी १५ मिनिटांची मुदत देण्यात आली, तेव्हा निवडणूक बिनविरोध करण्यास राष्ट्रवादीने नकार दिला. त्यामुळे राहुल जाधव आणि विनोद नढे यांच्यात थेट सामना झाला. १२८ सदस्यसंख्या असलेल्या सभागृहात महापौरपदासाठी ११३ जणांनी मतदान केले, त्यातील ८० मते राहुल जाधव यांना मिळाली. भाजपच्या संख्याबळापेक्षा तीन मते त्यांना जास्त मिळाली. ३६ सदस्यसंख्या असलेल्या राष्ट्रवादीच्या नढे यांना ३३ मते मिळाली, म्हणजे तीन मते कमी मिळाली. मनसेचे एकमेव नगरसेवक सचिन चिखले यांच्यासह पाच अपक्ष नगरसेवकांनी भाजपच्या पारडय़ात मते टाकली. शिवसेनेचे नऊ सदस्य आहेत, त्यातील सात सदस्यांनी भाजप तथा राष्ट्रवादीला पािठबा न देता तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. तर, शिवसेनेचे दोन सदस्य गैरहजर राहिले.

उपमहापौरपदाच्या निवडणुकीत १११ जणांनी मतदान केले, त्यापैकी भाजपच्या चिंचवडे यांना ७९, तर तापकीर यांना ३२ मते मिळाली. या वेळी नऊ जण तटस्थ होते. भाजपचे दोन्ही उमेदवार बहुमताने निवडून आल्याने त्यांच्या समर्थकांनी ढोल-ताशाच्या दणदणाटात भंडाऱ्याची वारेमाप उधळण केली. खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे आदींनी विजेत्या उमेदवारांचे अभिनंदन केले.

नाराज शत्रुघ्न काटे यांच्यासह आठ नगरसेवकांची दांडी

महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या तीन नगरसेवकांसह आठ जण गैरहजर राहिले. महापौरपदाचे भाजपचे प्रबळ दावेदार मानले जाणारे शत्रुघ्न काटे सलग दुसऱ्यांदा डावलण्यात आल्याने तीव्र नाराज होते. त्यांनी गैरहजर राहून आपली नाराजी व्यक्त केली. याशिवाय, भाजपचे तुषार कामठे, रवी लांडगे, राष्ट्रवादीचे डब्बू आसवानी, सुलक्षणा धर, शिवसेनेचे प्रमोद कुटे, सचिन भोसले हे मतदानासाठी नव्हते. महापौरपदासाठी मतदान केलेले मनसेचे सचिन चिखले आणि राष्ट्रवादीचे रोहित काटे उपमहापौरपदाच्या निवडणुकीत मात्र अनुपस्थित राहिले.