पिंपरी-चिंचवडमध्ये करोना विषाणू बाधित रुग्णांचा आकडा तीन वरुन आठ वर पोहचल्याने प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. पिंपरी-चिंचवडकरांनी घराच्या बाहेर पडू नये असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे. ते लोकसत्ता ऑनलाईनच्या प्रतिनिधीशी बोलत होते. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात तीन तर भोसरी येथील रुग्णालयात पाच पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

“करोना बधितांची संख्या ३ वरून ८ वर आली आहे. संबंधित रुग्णांवर उपचार सुरू असून डॉक्टरांचं विशेष लक्ष आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना सूचित करण्यात आलं आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. पिंपरी-चिंचवडमधील करोना बाधित रुग्णांमध्ये कोणत्याही विशेष प्रकारची लक्षणं दिसून आलेली नाहीत. त्यामुळे सर्वांनी काळजी घेणे महत्वाचे आहे. पिंपरी-चिंचवडकरांनी घरात राहावं.” आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी माहिती दिली.

मुलांनी, वडीलधाऱ्या व्यक्ती, गर्भवती स्त्रिया, आजारी जेष्ठ नागरिक यांनी स्वतः च्या आरोग्याची काळजी घेतली घेणं गरजेचं आहे अस ही ते म्हणाले आहेत. सर्व नागरिकांनी सर्वोतोपरी काळजी घ्यावी. सर्दी खोकला आला तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नागरिकांनी स्वच्छतेची काळजी घेतली, तर शहरात कोणताही प्रादुर्भाव होणार नाही असा विश्वास हर्डीकर यांनी व्यक्त केला.