मदतीसाठी याचना करणाऱ्यांना प्रतिसाद न देणारे अभियंते निलंबित

यंदाच्या पहिल्याच पावसात पिंपरी पालिकेच्या नियोजनाचा बोजवारा उडाल्याचे चित्र शहरात अनेक ठिकाणी दिसून आले होते, तेव्हाच थेरगाव काळेवाडी परिसरातील सुमारे ५० घरांमध्ये पाणी शिरले. मदतीसाठी याचना करणाऱ्या तेथील नागरिकांचे दूरध्वनी घेतले नाही म्हणून दोन अभियंत्यांवर आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केली आहे. दरवर्षी आढळून येणाऱ्या अशाच प्रकारच्या गैरव्यवस्थापनाची सविस्तर चौकशी करण्यासाठी आयुक्तांनी तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे.

थेरगाव-काळेवाडी परिसरात (‘ग’ क्षेत्रीय कार्यालय) २१ जून २०१८ मध्ये जोरदार पाऊस झाला, तेव्हा जागोजागी पाणी साचले. जवळपास ५० घरांमध्ये पाणी शिरले. नागरिकांच्या आरोग्यास तसेच जीवितास धोका निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली  होती. महापालिकेने आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले होते. त्यासाठी अधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांकही जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार, थेरगाव-काळेवाडी परिसरातील नागरिकांनी घरांमध्ये पाणी शिरल्यानंतर किशोर महाजन तसेच विजयकुमार काळे या अभियंत्यांना दूरध्वनी केले. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. ते त्या दिवशी कामावरच हजर नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. अधिकाऱ्यांच्या अशा वागण्याने नागरिक कमालीचे संतापले होते. लोकप्रतिनिधींनीही महाजन व काळे यांच्यासंदर्भात आयुक्तांकडे तक्रारी केल्या.

एकंदरीत परिस्थिती पाहून आयुक्तांनी अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली. तेव्हा दरवर्षी पावसाळ्यात असाच अनुभव येत असल्याचे गाऱ्हाणे नागरिकांनी मांडले.

अधिकाऱ्यांच्या या बेजबाबदारपणाची आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आणि या दोन्ही अभियंत्यांना निलंबित केले. त्याचप्रमाणे, या घटनेची चौकशी करण्यासाठी तसेच यापूर्वी झालेल्या गैरव्यवस्थापनाची सविस्तर माहिती घेण्यासाठी अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, आरोग्य कार्यकारी अधिकारी मनोज लोणकर, कार्यकारी अभियंता (स्थापत्य) मनोज सेठिया या तीन जणांची समिती त्यांनी नियुक्त केली आहे. याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर इतर दोषींवर कारवाई करण्याचे संकेत आयुक्तांनी दिले आहेत.