News Flash

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक: शहराच्या विकासापेक्षा सत्ताधारी नेत्यांचाच विकास: सोमय्या

राष्ट्रवादी काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीका

भाजपचे खासदार किरीट सोमय्या (संग्रहित छायाचित्र)

पिंपरी – चिंचवड महापालिका निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडू लागला आहे. भाजपचे खासदार किरीट सोमय्यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसवर अप्रत्यक्षपणे तोफ डागली आहे. शहराच्या विकासापेक्षा सत्ताधारी नेत्यांचाच विकास झाला, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. पिंपरी-चिंचवडमधील भ्रष्टाचार संपवणे गरजेचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

राज्यातील महापालिका निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. राज्यात श्रीमंत म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपनेही प्रतिष्ठेची केली आहे. पिंपरी -चिंचवडमध्ये आपली सत्ता राखण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू असताना, नगरपालिका निवडणुकांमध्ये यश मिळाल्याने उत्साह दुणावलेल्या भाजपने त्यांना आव्हान देण्याची रणनिती आखल्याचे दिसते आहे. त्यादृष्टीने भाजपच्या नेत्यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये ठाण मांडल्याचे दिसते आहे. भाजपकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर लढवली जाईल, असे संकेत भाजपकडून देण्यात आले आहेत, असे दिसते. भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. शहरातील विकासावर भर देत त्यांनी भ्रष्टाचार संपवण्याचा निर्धार केला आहे. शहराच्या विकासापेक्षा सत्ताधारी नेत्यांचाच विकास अधिक झाला आहे, अशी टीका सोमय्या यांनी केली आहे.

मुंबई महापालिकेत भाजपने माफियांचा पर्दाफाश करण्याची मोहीम हाती घेतली आहे. तशीच मोहीम पिंपरी – चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाऱ्यांविरोधात घेण्यात येणार असल्याचा सूचक इशारा त्यांनी दिला. महापालिकेतील भ्रष्टाचार संपवणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. तसेच घरकूल घोटाळा, गॅस शवदाहिनी घोटाळा, पिंपरी-पुणे बीआरटी घोटाळा झाला असून, त्यात सामील असलेल्यांविरोधात फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात येणार असल्याचेही किरीट सोमय्या यांनी सांगितले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2017 5:31 pm

Web Title: pimpri chinchwad municipal corporation election 2017 bjp mp kirit somaiya attack on ncp
Next Stories
1 सत्तेच्या लालसेपोटी पक्षांतर करणाऱ्यांना पुणेकर जागा दाखवतील: राष्ट्रवादी काँग्रेस
2 हजारी भागप्रमुखांची ‘शाळा’
3 ऑनलाइन वीजबिल भरणा १०० कोटींवर
Just Now!
X