डॉक्टरांचे राजकारण, औषधांचा कृत्रिम तुटवडा

बाळासाहेब जवळकर balasaheb.javalkar@expressindia.com

पिंपरी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयाचा कारभार वाईटातून अधिक वाईटाकडे चालला आहे. रुग्णसेवा ही ईश्वरसेवा आहे, असे वाटण्यासारखी परिस्थिती रुग्णालयात दिसून येत नाही. डॉक्टरांचे घाणेरडे राजकारण, औषधांचा कृत्रिम तुटवडा, खासगी रुग्णालयांशी संगनमत, रुग्णहिताऐवजी खरेदीच्या कामातच स्वारस्य, अपुरे मनुष्यबळ, चांगल्या डॉक्टरांची कमतरता असे अनेक मुद्दे आहेत. मात्र, त्याकडे महापालिका आयुक्त आणि सत्ताधारी नेते यापैकी कोणाचेही गांभीर्याने लक्ष नाही आणि नियंत्रण म्हणावे तरीही कोणाचेच नाही.

 

िपपरी महापालिकेच्या स्थापनेनंतर प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या दूरदृष्टीतून शहरातील गरीब आणि गरजू नागरिकांना उपयुक्त ठरावे म्हणून प्रशस्त असे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएमएच) उभारण्यात आले. पांढरा हत्ती म्हणून सुरुवातीला या रुग्णालयावर चौफेर टीका झाली. मात्र, कालांतराने या रुग्णालयाची उपयुक्तता सिद्ध होत गेली. आजमितीला ७०० खाटा असलेल्या या रुग्णालयात जवळपास काही अपवाद वगळता सर्वच आजारांवरील उपचारांची सुविधा उपलब्ध आहे. माफक दरात चांगल्या प्रकारे उपचार मिळतात म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील नागरिक चव्हाण रुग्णालयात येत होते आणि अजूनही येत आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा असे मानून रुग्णालयाचा कारभार होता. आवश्यक औषधांसह चांगल्या सोयीसुविधा देणारे रुग्णालय म्हणून चव्हाण रुग्णालयाची राज्यभरात ख्याती होती. मात्र, हा काळ आता इतिहासजमा झाला. सध्याची परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे.

एवढय़ा मोठय़ा रुग्णालयाचा कारभार आता रामभरोसे आहे. रुग्णालयात उपचारांसाठी येणाऱ्या नागरिकांना किती त्रासाला सामोरे जावे लागते, याची मोजदाद नाही. केसपेपरपासून प्रत्येक ठिकाणी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या भल्या मोठय़ा रांगा लागलेल्या असतात. सोमवारी आणि गुरुवारी हे प्रमाण सर्वाधिक असते. त्याचे कारण काय आहे, याचा कधीही विचार झालेला नाही. रांगा कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना होत नाहीत. रुग्णांना तपासून झाल्यानंतर जी औषधे लिहून दिली जातात. ती बहुतांश वेळा रुग्णालयातून मिळत नाहीत. महागडी असणारी औषधे हमखास बाहेरून आणण्याची सक्ती केली जाते.

रुग्णांना खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घेण्यास सुचवले जाते. वेळप्रसंगी दबाव आणला जातो. त्यामध्ये डॉक्टरांचा कमिशनचा जोडधंदा आहे.  तज्ज्ञ डॉक्टर या रुग्णालयात येण्यास तयार नाहीत. जे डॉक्टर उपलब्ध आहेत, त्यांना विविध प्रकारे त्रासच दिला जातो. रुग्णालयाचा कारभार सध्या मानधनावरील डॉक्टरांच्या हातात आहे. महापालिकेचे अधिकारी हळूहळू कमी होत चालले आहेत. त्यांच्या रिक्त जागा भरल्या जात नाहीत. डॉक्टरांचे घाणेरडे राजकारण वेगवेगळ्या प्रकरणात सातत्याने दिसून आलेले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांची गटबाजी आणि त्यांच्यातील हेवेदावे हेच रुग्णालयाचे वाटोळे करण्याचे प्रमुख कारण ठरले आहे. या सर्व गोष्टींमुळे रुग्णालयात उपचारांसाठी येणारा रुग्ण दहा वेळा विचार करू लागला आहे.  जे रुग्ण येतात, त्यांच्या जीविताशी खेळ होतो आहे, याचे कोणालाही सोयरसुतक नाही. यापूर्वीचे असोत की सध्याचे सत्ताधारी, त्यांच्या दृष्टीने चव्हाण रुग्णालय हे संगनमताने चरण्याचे हक्काचे कुरण झाले आहे. आतापर्यंत असाच दृष्टिकोन कायम ठेवला गेला, त्याचा परिणाम म्हणून सध्याची परिस्थिती उद्भवली आहे.

नागरिकांना चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळतात की नाही, याचा विचार करण्याऐवजी कोटय़वधी रुपयांच्या खरेदीतच रस असणारे महाभाग सर्वश्रुत आहेत. रुग्णालयाच्या कारभाराचे तीन तेरा वाजले असले तरी, त्यात काही सुधारणा करावी, असे वाटत नाही, हेच शहरातील नागरिकांचे दुर्दैव आहे.

रुग्णालयात पाण्याचा तुटवडा

गेल्या १५ दिवसांपासून रुग्णालयात पाण्याचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. पाण्याचे कोणतेही नियोजन नसल्याने सर्व विभागात पाण्याची ओरड आहे. शवविच्छेदन विभागात पाणी नसल्याने गंभीर परिस्थिती आहे. एकीकडे पाण्याचे दुर्भिक्ष्य असताना दुसरीकडे रुग्णालयाच्या अंतर्गत भागात बांधकामांना पिण्याचे पाणी वापरले जात असून झाडे, बगिचा, शौचालये, सफाई अशा कामांना मुबलक पाणी वापरले जात आहे. पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी रुग्णालयात प्रकल्प राबवण्यात आला असला तरी तेथून पाण्याची अपेक्षित उपलब्धता होत नसल्याने सगळीकडे पिण्याच्या पाण्याचा वापर होतो आहे. रुग्णालयासाठी पाच लाख लीटर क्षमतेच्या दोन स्वतंत्र टाक्या आहेत. तरीही पाण्याची कमतरता दिसून येते. त्याचे कारण शोधून काढले पाहिजे. आतापर्यंत रात्रीच पाण्याच्या टाक्या भरून ठेवण्यात येत होत्या. ते पाणी दिवसभर पुरत होते. आता मात्र पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. डॉ. पद्माकर पंडित, मनोज देखमुख यांच्याकडे तक्रारी गेल्या. मात्र, त्याचा काही उपयोग झालेला दिसत नाही. डॉक्टर आणि अधिकाऱ्यांची शक्ती एकमेकांची जिरवण्यात खर्ची पडत असल्याने रुग्णांना होणाऱ्या त्रासाकडे पाहण्यासाठी त्यांना वेळ नाही. राजकारण्यांना तर काहीही सोयरसुतक नाही. त्यामुळे रुग्णसेवाच अतिदक्षता विभागात असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.