महापालिका निवडणुकीच्या प्रचाराने अंतिम टप्पा गाठला आहे. तसा सर्वच पक्षांनी आपल्या प्रचाराची पातळीही खालच्या स्तरावर नेल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही पिंपरी चिंचवड येथील प्रचारसभेत बोलताना स्वत:वर आवर घालणे जमले नाही. बोलण्याच्या ओघात त्यांनी मुख्यमंत्र्यांबाबत एका ग्रामीण म्हणीचा पूर्वाध वापरत टोला लगावला. पवार यांच्या या बोलण्याने उपस्थितांमध्ये जरी हशा पिकला असला तरी राजकीय क्षेत्रात पवारांच्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. नागपूरचे लोक कष्टाळू व चांगले आहेत. त्यांना चांगलं नेतृत्व मिळाले असते तर या शहराचीही पिंपरी चिंचवड इतकंच काय रांजनगाव यापेक्षाही जास्त प्रगती झाली असती. परंतु, तिथल्या नेत्यांमध्येही ही कुवतच नाही, असे फडणवीस यांचे नाव न घेता मुख्यमंत्रीपद नशिबाने मिळाल्याचे सांगत आंधळ्याचा हात कुठं तरी… असं अर्धवट म्हणत मी जास्त काही सांगत नाही, असा टोला लगावला. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी असे शब्द वापरल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हाती राज्याची धुरा आली. पण त्यांच्या हातून राज्य हिताची जपणूक केली जाणार नाही. त्यांच्या हातून राज्य एकसंध ठेवला जाणार नाही. ते काय सांगतात याच्यावर तुमचा विश्वास बसणार नाही, याची मला खात्री आहे, असे त्यांनी उपरोधिकपणे म्हटले. कुवत नसताना मुख्यमंत्रीपद हाती आले. नशिबाने घडतं असे म्हणतात. ते खरं आहे आंधळ्याचा हात कुठं तरी.. असे अर्धवट बोलत मी काय जास्त सांगत नाही, असे त्यांनी मिश्किल हास्य करत म्हटले. पिंपरी चिंचवड येथील सांगवी येथे राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. या वेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विलास लांडे व सर्व उमेदवार उपस्थित होते.
मुख्यमंत्री हे नागपूरचे अनेकवर्षे महापौर होते. नागपूर ही राज्याची दुसरी राजधानी आहे. या शहराचा विकास करण्यासाठी आम्ही सर्वांनी लक्ष घातले. त्या ठिकाणी कारखानदारी कशी येईल याची खबरदारी घेतली. या संपूर्ण कालखंडात त्या लोकांची भूमिका काय होती, असा सवाल त्यांनी भाजपचे नाव न घेता केला. पुन्हा तिथे गेल्यानंतर सांगायचे पिंपरी चिंचवडला, रांजणगावला, शिरूरला कारखानदारी येते. पण आमच्याकडे येत नाही, असे म्हणत बसायचे. तुमच्या नेत्यांत दम नाही. काम करण्याची कुवत नाही. विकासकामे करण्याचा दृष्टीकोन नाही, अशी टीका त्यांनी या वेळी केली.
गेल्या काही दिवसांपासून विविध राजकीय पक्षांच्या प्रचाराने संपूर्ण राज्य ढवळून निघाले. एकीकडे राज ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्या तोफा धडाडात असताना आपल्या संयमी भाषणासाठी प्रसिद्ध असणारे शरद पवार हेही या नेत्यांच्या रांगेत येऊन बसले आहेत.