पिंपरी-चिंचवड शहरात खुनाचं सत्र सुरूच आहे. वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मित्रासाठी एकाने २० वर्षीय तरुणाचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुख्य आरोपीसह इतरांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. ऋषभ गायकवाड असं खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपीच्या मित्राचे आणि त्याचा वाद झालेला होता. या पार्श्वभूमीवर काही महिन्यांनी कट रचून शुक्रवारी रात्री उशिरा त्याचा खून करण्यात आला.

मुख्य आरोपी गुड्डया उर्फ किशोर ज्ञानदेव शेलार, सीजीन फिलीप जॉर्ज, रोहित सिंग, सचिन साठे असे खुनाच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी प्रमोद किसन गायकवाड वय- २६ यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत ऋषभ गायकवाड आणि आरोपी सीजीन फिलीप जॉर्ज याचा वर्षाभरापूर्वी वाद झालेला होता. तेव्हा पोलिसात प्रकरण न जाता त्यांनी एकमेकांना सॉरी म्हणून प्रकरण मिटवल होतं.  परंतु, सीजीन फिलीप जॉर्जच्या मनात याबद्दल राग होताच. तेव्हाच, आरोपी गुड्ड्या उर्फ किशोर ज्ञानदेव शेलारला एका गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली होती. त्याची जामिनावर सुटका जॉर्ज याने केली. तेव्हा पासून दोघांची मैत्री झाली होती.

दरम्यान, जॉर्जने ऋषभ बद्दल झालेली घटना सांगितली. त्यानंतर गुड्ड्या आणि जॉर्ज या दोघांनी ऋषभला ठार मारण्याचा कट रचला. त्याप्रमाणे यासाठी इतरांची मदत घेतली गेली. शुक्रवारी ऋषभला धोक्याने बोलावून घेऊन त्याच्यावर  कोयत्याने वार करण्यात आले एवढच नाहीतर दगडाने ठेचून त्याला ठार केले गेले. या घटनेनंतर  अवघ्या काही तासात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांच्या पथकाने तपास करत आरोपींना अटक केली.