’ मुख्यमंत्र्यांची शिष्टाई  ’ भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या पाठपुराव्याला यश

पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणासाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांना साडेबारा टक्के जमीन परतावा देण्याचा सुमारे ३० वर्षे रखडलेला विषय मार्गी लागला आहे. सोमवारी (१ जुलै) मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत याबाबतच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. त्यानुसार १०६ शेतकऱ्यांना उपलब्धतेनुसार जमिनीचे वाटप केले जाणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पिंपरी प्राधिकरणाशी संबंधित विविध विषयांवर विधानभवनात महत्त्वपूर्ण बैठक झाली. प्रधान सचिव नितीन करीर, भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार, पिंपरी प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, नगरसेवक नामदेव ढाके, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी कैलास कुटे आदी उपस्थित होते.

पिंपरी प्राधिकरणाने १९७२ ते १९८४ या कालवाधीत अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या आहेत. त्यांना साडेबारा टक्के परतावा देण्याचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. यासंदर्भात, शेतकऱ्यांनी तसेच विविध संस्था, संघटनांनी अनेक आंदोलने केली. राजकीय पातळीवरही या विषयावरून सातत्याने राजकारण झाले. मात्र, हा प्रश्न तडीस नेण्यात कोणालाही यश आले नाही. भाजप-शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले. चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णायक बैठक झाली. तेव्हा प्राधिकरणाकडे उपलब्ध असलेल्या जमिनीनुसार मूळ शेतकऱ्यांना सहा टक्के जागा आणि सहा टक्के चटई क्षेत्र निर्देशांक या स्वरूपात परतावा दिला जाणार आहे. या निर्णयामुळे ३० वर्षांपासून जमीन परताव्याची वाट पाहणाऱ्या प्राधिकरण बाधित शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळणार आहे.

..मग तर हा प्रश्न सुटलाच पाहिजे

पिंपरी प्राधिकरणाच्या मुख्य कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी काही वर्षांपूर्वी आंदोलन केले होते, तेव्हा भाजपचे प्रदेश सरचिटणीस असलेले देवेंद्र फडणवीस या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांनी या आंदोलनाला पािठबाही दिला होता. ही आठवण बैठकीत फडणवीस यांना करून देण्यात आली. ‘मग तर हा प्रश्न सुटलाच पाहिजे’, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी लगेचच दिली.

शेतकऱ्यांना जमिनींचा परतावा देण्याचा महत्त्वपूर्ण विषय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मार्गी लागला असून याचा लाभ १०६ शेतकऱ्यांना मिळणार आहे. भाजपने दिलेला शब्द पाळला आहे. तीनही आमदारांनी पाठपुरावा केला, त्याला यश आले.

– सदाशिव खाडे, अध्यक्ष, पिंपरी प्राधिकरण