पिंपरी- चिंचवड परिसरातील कासारवाडी येथे नववधूच्या आईला विवाह समारंभात फोटो काढणे चांगलेच महागात पडले. आई फोटो काढण्यात व्यस्त असल्याची संधी साधून चोरट्याने आठ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कासारवाडी येथील गंधर्व गरीमा लॉन्स येथे बुधवारी पंकज पल्लेवार आणि पूजा झरकर यांचा विवाहसोहळा पार पडला. लग्नविधी आटोपल्यानंतर फोटो सेशन सुरू झाले.पंकज आणि पूजा या दोघांचे सोन्याचे दागिने पूजाच्या आईकडे म्हणजेच छाया यांच्याकडे होते. छाया यांनी दागिने पर्समध्ये ठेवले होते. काही वेळाने फोटो काढण्यासाठी छाया यांनी पर्स शेजारील बाकड्यावर ठेवली. याच संधीचा फायदा चोरट्यांनी घेतला. चोरट्यांनी पर्सवर डल्ला मारला असून या पर्समध्ये आठ लाख रुपयांचे दागिने होते. यात बाजू बंध,सोन्याचा हार,सोन्याचे नेकलेस,कर्णफुले,गंठण आणि पंकजच्या काही दागिन्यांचा समावेश आहे. काही वेळाने फोटो काढून बाकड्याजवळ आल्या असता छाया यांना पर्स चोरीला गेल्याचे लक्षात आले. या प्रकरणी रामचंद्र गणपतराव झरकर यांनी भोसरी पोलिसात तक्रार दिली असून भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.