पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून करोना विषाणूचे रुग्ण वाढत आहेत. गंभीर बाब म्हणजे चिंचवडमधील आनंदनगर परिसरात सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. तेथील नागरिकांना निगडी प्राधिकरण येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात क्वारंटाइन करण्यात येत आहे. परंतु, स्थानिक नगरसेवक राजू मिसाळ, अमित गावडे, माजी महापौर आर.एस.कुमार यांनी त्याला विरोध केला. या प्रकरणी त्यांना रावेत पोलिसांनी ताब्यात घेतलं आले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

शहराच्या मध्यवर्ती असलेल्या आनंदनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर करोना बाधित रुग्ण आढळत आहेत. त्यानुसार तेथील शेकडो नागरिकांना क्वारंटाइन करण्यात येणार आहे. दरम्यान, आनंद नगर परिसरातील १४ जणांना निगडी परिसरातील अभियांत्रिकी महाविद्यालयात क्वारंटाइन करण्यात आलं आहे. परंतु, आणखी व्यक्तींना तिथे क्वारंटाइन करण्यास नगरसेवक राजू मिसाळ यांनी विरोध केला आहे. संबंधित ठिकाणी त्यांनी ठिय्या आंदोलन ही केले. महाविद्यालयात जाऊन मिसाळ यांची समजूत काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला, संचारबंदी असल्याचं ही सांगितलं. अखेर यांच्यासह इतरांना ताब्यात घेण्यात आले. अर्धा तास पोलीस चौकित बसवून सर्वांना नोटीस बजावून सोडून देण्यात आले. अशी माहिती पोलीस अधिकारी पवार यांनी दिली आहे.

“आनंदनगर परिसरातील काही नागरिकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. आम्हाला सांगितलं नाही, कोणाला ही प्रशासनाने विश्वासात घेतले नाही. त्यामुळे आम्ही विरोध करत आहोत. प्राधिकरण परिसरातील जेष्ठ नागरिक घाबरलेले आहेत. म्हणून आम्ही ठिय्या आंदोलन करत विरोध केला आहे. आनंदनगर परिसरातील व्यक्तींची इतरत्र सोय करावी. क्वारंटाइन करण्यात आलेल्या १४ नागरिकांपैकी ३ जण पॉजिटिव्ह आलेले आहेत”

-राजू मिसाळ, स्थानिक नगरसेवक