पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला व्हॉट्सअॅप ग्रुपच्या मदतीने गुजरातमधून अटक केली आहे. गुन्हे शाखा एकने ही कारवाई केली आहे. या गुन्हेगाराने केलेल्या एका लुटीचे सीसीटीव्ही फुटेज आणि फोटो महाराष्ट्र क्राईम डिटेक्शन व नैशनल क्राईम डिटेक्शन ग्रुपवर पोस्ट करण्यात आला होता. त्यानुसार गुजरातमधील पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.

रोहित ऊर्फ कालू दलपत घमंडे (वय ३०, रा. गुजरात) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर विविध राज्यात एकूण पाच गुन्हे दाखल आहेत. रोहित पोलिसांच्या ताब्यात आला असला तरी अद्याप त्याचे चार साथीदार फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी रवी अमिचंद मेहता (वय ७१) हे सोने आणि चांदीचा व्यवसाय करतात. ते मूळचे पंजाब येथील असून महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, गुरजरात येथील सोने व्यवसायिक दुकानदारांकडे जाऊन सोन्याचे आणि चांदीचे दागिने विकण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. डिसेंबर महिन्यात ते सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन सकाळी पिंपरीच्या आंबेडकर चौकातून जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने मेहता यांच्या हातातील बॅग हिसकावून पळ काढला. या घटनेत ते जखमी झाले होते.

त्यानंतर गुन्हे शाखा एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली या लुटीचा तपास सुरु झाला. महाराष्ट्र क्राईम डिटेक्शन आणि नॅशनल क्राईम डिटेक्शन या व्हॉट्सअॅप ग्रुपवर त्यांनी फोटो आणि सीसीटीव्ही फुटेज अधिक स्पष्ट करून पोस्ट केले होते. यावरुन खबऱ्यांमार्फत गुन्हे शाखा एकच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आरोपीबाबत तो गुजरातचा रहिवासी असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेने एक पथक तयार करून गुजरातमधील अहमदाबाद शहरात पाठवले.

या घटनेची स्थानिक पोलिसांनाही माहिती देण्यात आली आणि अहमदाबाद गुजरात येथील छारानगर, कुबेरनगर येथे सापळा रचून पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुन्हेगार रोहित ऊर्फ कालू दलपत घमंडे याला अटक केली. या अटकेनंतर त्याने इतरही गुन्हे कबूल केले आहेत. दुसऱ्या घटनेत पिंपरीमध्ये मित्राकडून उसणे पैसे घेऊन मुलाची शाळेची फी भरण्यासाठी जात असलेल्या एका कार चालकाचे ३ लाख रुपये त्याने पळवले होते.