dकरोनाविरुद्ध लढण्यासाठी केंद्र सरकारतर्फे संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या काळात अत्यावश्यक सेवांचा अपवाद वगळता सर्व प्रकारच्या सार्वजनिक वाहतुकीवर बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र देशाच्या अनेक भागात या अत्यावश्यक सेवा पुरवणारी वाहनं परिस्थितीचं गांभीर्य न ओळखता प्रवासी वाहतूक करत असल्याचं समोर आलं आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये वाकड पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी नाकाबंदीदरम्यान एका टेम्पोवर कारवाई केली, ज्यात ७ लहान मुलांसोबत ४६ कामगार आढळून आले. हे सर्व कामगार कर्नाटकमधील बेळगाव या भागातले आहेत, मुंबईतील सांताक्रूझ भागात हे काम करत होते. सर्व कामगारांना खाली उतरवल्यानंतर पोलिसांनी टेम्पो मालक आणि चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

संतोष पांडे असं टेम्पो मालकाचं नाव असून चालकाचं नाव रामदयाल पांडे असं चालकाचं नाव आहे. संतोष पांडे हा अत्यावश्यक सेवेत मोडणारा माल आणण्यासाठी मुंबईवरुन सोलापूरला जात होता. मुंबईवरुन निघताना सांताक्रूझ भागात संतोष पांडेने कामगारांना आपल्या टेम्पोत प्रवासी म्हणून बसवलं. यावेळी पांडेने त्यांच्याकडून काही रक्कमही घेतली. पोलिसांना संशय येऊ नये म्हणून टेम्पोच्या मागच्या भागावर ताडपत्री लावण्यात आली.

हा टेम्पो वाकडमार्गे जात असताना, पोलिसांनी नाकांबदीमध्ये टेम्पोची चौकशी केली. ज्यात कामगार अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत आजुबाजूला बसलेले सापडले. प्रशासनाने अत्यावश्यक सेवा वगळून इतर वाहनांना वाहतुकीस बंदी आहे. मात्र, अत्यावश्यक सेवा असलेल्या टेम्पोमधूनच अशी प्रवाशी वाहतूक केली जात आहे. चालक आणि मालक यांच्यावर वाकड पोलिसांनी कलम १८८, राष्ट्रीय आपत्ता कायदा आणि महाराष्ट्र करोना अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येत आहेत. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वामी यांच्या पथकाने केली आहे.

अवश्य वाचा – करोनाच्या संकटाशी लढणाऱ्या हिरोंची ‘ते’ घेत आहेत काळजी