पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हे नेहमीच आपल्या सिंघम स्टाइल आणि फिटनेसमुळे चर्चेत असतात. भविष्यात पोलीस सेवेत जाण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अनेक तरुणांनी कृष्ण प्रकाश यांचा आदर्श समोर ठेवला आहे. कधी आपल्या कारवाईमुळे तर कधी सर्वसामान्यांना मदतीसाठी पुढाकार घेत असल्याने ते नेहमी चर्चेत असतात. दरम्यान नुकतंच त्यांचं अजून एक नवं रुप समोर आलं ज्यामध्ये त्यांनी वेषांतर करुन पोलीस नेमकं कसं काम करतात याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला.

पोलीस सर्वसामान्यांना नेमकी कशी वागणूक देतात हे जाणून घेण्यासाठी कृष्ण प्रकाश यांनी रात्री एक मोहीम राबवली. यासाठी ते वेषांतर करुन पोलीस ठाण्यात पोहोचले होते. पोलिसांची परीक्षा घेण्यासाठी कृष्ण प्रकाश चक्क ‘मटणवाले चाचा’ बनले होते. तर या मोहिमेत सहाय्यक आयुक्त प्रेरणा कट्टे त्यांच्या पत्नी बनल्या होत्या. दोघंही वेषांतर करुन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गेले होते.

सर्वात प्रथम कृष्ण प्रकाश पिंपरी पोलीस ठाण्यात पोहोचले होते. शेजाऱ्याला कोविडसाठी रुग्णवाहिका हवी होती, पण फोन केला तर आठ हजार रुपये सांगितले असल्याची तक्रार केली आहे. पण यावेळी पोलिसांनी त्यांना पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. पण कृष्ण प्रकाश यांनी खरं रुप दाखवताच अधिकाऱ्यांची भांबेरी उडाली.

याशिवाय कृष्ण प्रकाश हिंजवडी पोलीस ठाण्यात पोहोचले होते. यावेळी त्यांनी रमजानचा उपवास ठेवत असून परिसरात काही लोक रोज फटाके वाजवतात, त्याचा त्रास होत असल्याची तक्रार केली. तसंच पत्नीची छेड काढल्याचं आणि मारहाण झाल्याची खोटी तक्रार दिली. मात्र यावेळी तिथे त्यांना चांगला अनुभव आला. पोलीस कर्मचाऱ्याने त्यांची तक्रार लिहून घेत वरिष्ठांना कळवण्याबद्दल सांगितलं. पण समोरील व्यक्ती पोलीस आयुक्त आहे कळाल्यावर त्यांनाही धक्का बसला.

कारवाईबद्दल काय म्हणाले पोलीस आयुक्त –
“आम्ही करोना काळात आणि इतर वेळीही लोकांना चांगली वागणूक द्यावी, तसंच तक्रार नोंद करुन घ्यावी अशा सूचना दिल्या होत्या. त्यासाठी मी वेषांतर करुन अनुभव घेण्यासाठी गेलो होतो. पोलीस महासंचालक आणि सरकारनेही लोकांना त्रास होता कामा नये अशा सूचना केल्या आहेत. निर्बंधांचं पालन झालं पाहिजे, पण लोकांना विनाकारण त्रास होता कामा नये. त्यासाठीच मी या भेटी दिल्या,” असं कृष्ण प्रकाश यांनी सांगितलं आहे.