पिंपरी-चिंचवड शहरात करोना विषाणूचे १२ रुग्ण आढळल्याने शहरातील नागरिक चिंतेत आहेत. परंतु, गेल्या चार दिवस एक ही रुग्ण न आढळल्याने सध्या शहरात समाधान व्यक्त केलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून गर्दी न करण्याचे सांगण्यात येत आहे. परंतु त्याचे पालन होताना दिसत नाही. दरम्यान, तळेगाव पोलीस ठाण्याच्या परिसरात भाजी विक्रेत्यांकडे गर्दी होत आहे. यावर तळेगाव पोलिसांनी अनोखी शक्कल लढवली आहे. याचे सर्वत्र कौतुक केले जात असून फोटो व्हायरल होत आहेत.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात तळेगाव पोलीस ठाणे आहे. करोना विषाणूचे थैमान सर्वत्र सुरू असून नागरिक भाजी खरेदी करताना गर्दी करत आहेत. तळेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी आणि त्यांच्या पथकाने अनोखी शक्कल लढवत भाजी विक्रेत्यापासून काही अंतरावर पांढऱ्या रंगाचे पट्टे ओढण्यात आले आहेत. तसेच ग्राहकांसाठीही विशेष अश्या भागात उभे राहून खरेदी करण्याची सोय केली आहे. त्यामुळे आता गर्दीचे प्रमाण कमी झाले असून सर्वांना भाजी खरेदी करता येत आहे. तेथील अनेक फोटो व्हायरल होत असून तळेगाव पोलिसांच सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.