पिंपरी-चिंचवड शहरातील नेहरु नगर येथे अज्ञात शंभर जणांच्या टोळक्याने वाहनांची तोडफोड आणि एकावर हल्ला करून त्याला जीवे मारण्याच्या प्रयत्न केला होता. याप्रकरणी मुख्य आरोपी सह इतरांना अटक करण्यात आली असून या आरोपींची सायंकाळच्या सुमारास पिंपरी पोलिसांनी धिंड काढली आहे. अश्याच प्रकारे सोमवारी सायंकाळी वाकड पोलिसांनी मुळशी पॅटर्न स्टाईल आरोपींची धिंड काढली होती, त्यामुळे पोलिसांच्या या कारवाईची सध्या शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे.

पिंपरीतील नेहरु नगर येथे अज्ञात शंभर जणांच्या टोळक्याने गेल्या आठवड्यात दहशत पसरवत एकावर खुनी हल्ला केला होता. तसेच दहा वाहनांची तोडफोडही या टोळक्याने केली होती. दुचाकीवरुन आलेल्या आरोपींनी कोयते आणि तलवार नाचवत हुल्लडबाजी केली. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी १४ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. याव्यतिरीक्त मुख्य आरोपीसह 20 जणांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, मंगळवारी सायंकाळच्या सुमारास पिंपरी पोलिसांनी या आरोपींची घटनास्थळी धिंड काढून गुन्हेगारांना कडक संदेश दिला. गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवडमध्ये वाहनांच्या तोडफोडीचं सत्र चांगलंच वाढलं आहे. यातील आरोपींवर वचक बचावा आणि नागरिकांमध्ये यांची दहशत बसू नये यासाठी पोलिसांनी हा मार्ग अवलंबला आहे.

सोमवारी, वाकड पोलिसांनी अशाच पद्धतीने अज्ञात सहा आरोपींची धिंड काढत टक्कल करून दहशत पसरविणाऱ्या परिसरात फिरवले होते. त्याची चर्चा शहरभर रंगली असून आरोपींचे खच्चीकरण करून सर्वसामान्य नागरिकांना पाठबळ देण्याचं काम पोलीस करत आहेत. वारंवार तोडफोडीच्या घटनानंतर पिंपरी-चिंचवड पोलीस वेगळ्या पॅटर्न चा अवलंब करत असून त्याचे नागरिकांकडून त्याचं कौतुक होत आहे.