पिंपरी-चिंचवडमध्ये देहूरोड परिसरात चार दुकानाचे शटर उचकटून २० मोबाईल चोरी केल्याची घटना समोर आली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या घटनेप्रकरणी देहूरोड पोलिसात अज्ञात तीन तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे देहूरोड पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास देहूरोड येथील मुख्य बाजार पेठेतील चार दुकाने अज्ञात तीन चोरांनी फोडली. शटर उचकटून चोरट्यांनी माल लंपास केला. यातील एका दुकानातील १९ मोबाईल तर दुसऱ्या दुकानातील १ मोबाईल चोरला आहे. दरम्यान, हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. दोन अज्ञात चोरांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला तर एक जण रस्त्यावर थांबून पाहणी करत होता. या घटनेत सीसीटीव्हीत कैद झालेले चोरटे आढळून आल्यास तातडीने देहूरोड पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष कल्याणकर यांनी केले आहे. या घटनेमुळे देहूरोड परिसरातील व्यापारी भीतीच्या सावटाखाली आहेत. पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.