पालिकेकडे आठ वर्षांपासून यंत्रणाच नाही, कुशल कर्मचाऱ्यांचाही अभाव

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात जागोजागी, रहदारीच्या रस्त्यांवर मोठय़ा संख्येने वावरणाऱ्या मोकाट जनावरांची समस्या आता गंभीर वळणावर आहे. दिवसेंदिवस अशा जनावरांची संख्या वाढत असून त्यामुळे विविध प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र, त्याचे कोणाला सोयरसुतक नसल्याचे दिसून येते. महापालिकेचे दुखणे वेगळेच आहे. गेल्या ८ वर्षांपासून अशी जनावरे पकडण्याची यंत्रणाच पालिकेकडे नाही.

वेगाने विकसित होत चाललेल्या पिंपरी-चिंचवड शहरात मोकाट जनावरांची समस्या दिवसेंदिवस त्रासदायक ठरू लागली आहे. रस्त्यांवर जागोजागी गाय, म्हैस, बैल, वळू आदी मोठय़ा प्रमाणात दिसून येत आहेत. काही वर्षांपासून शहरवासीयांना ही समस्या भेडसावते. जनावरांचे मालक आपली जनावरे रस्त्यावर सोडून देतात. नंतर, त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. नंतर ही जनावरे रस्त्यावर ठिय्या मांडून बसतात. कुठेही कशाही प्रकारे वावरतात. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्यांना अडथळे जाणवतात. वाहतुकीचा खोळंबा होतो आणि अपघातही होतात. काही वेळा ही जनावरे हिंसक होतात, त्यामुळे एखाद्याला दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी पकडून आणलेली जनावरे भोसरी पांजारपोळ येथे दिली जात होती. तेथे आता जागा उपलब्ध नाही.

महापालिकेकडे स्वत:ची अशी जागा नाही आणि यंत्रणाही नाही. त्यामुळे जनावरे धरून आणल्यास ती ठेवायची कुठे, असा प्रश्न पालिकेपुढे असतो. त्यातून रस्त्यावरील भटकी जनावरे पकडायची नाहीत, असा सोयीस्कर मार्ग पालिकेने स्वीकारला. महापालिका अधिकारी याबाबत उदासीन आहेत. लोकप्रतिनिधींना सोयरसुतक नसल्याने ही समस्या गंभीर होत चालली आहे.

मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर आहे. सध्या आपल्याकडे जागा नाही. तसेच, जनावरे पकडण्याची यंत्रणा नाही. यासंदर्भातील सर्व पर्यायांचा विचार सुरू आहे. शक्य तितक्या लवकर उपाययोजना करण्याचा प्रयत्न करू.

– डॉ. अरूण दगडे, पशुवैद्यकीय अधिकारी, पिंपरी पालिका