पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३५० सोसायट्यांमधील १४८ सुरक्षा रक्षक आपल्या ड्युटीदरम्यान झोपा काढत असल्याचे पोलिसांनी केलेल्या पाहणीत निदर्शनास आले आहे. त्यामुळे सोसायट्यांमधील रहिवासी सुरक्षित आहेत का? असा प्रश्न निर्माण होत आहे. रात्र झाल्यानंतर खऱ्या अर्थाने सुरक्षा रक्षकांचे कर्तव्य सुरू होते, परंतू काही जणांनी याकडे कानाडोळा करीत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी भर दिवसा सप्टेंबर महिन्यांत वाकड पोलिसांच्या हद्दीतल्या एका सोसायटीमधील बंद फ्लॅटची रेकी करून अवघ्या दहा मिनिटांत सोने-चांदीचे दागिने चोरी करून एक सराईत गुन्हेगार पसार झाला होता. त्याला शोधण्यासाठी वाकड पोलिसांना सोशीयल मीडियाचा आधार घ्यावा लागला होता. या घटनेनंतर पोलिसांनी गांभीर्याने घेत गस्त वाढवली होती. आपल्या या मोहिमेअंतर्गत मंगळवारी रात्री उशिरा वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हरीश माने यांच्या पथकाने वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाकड, काळेवाडी, राहटणी या ठिकाणच्या तब्बल ३५० सोसायट्या पिंजून काढत किती सुरक्षा रक्षक आपले कर्तव्य काटेकोरपणे पार पाडतात याची पडताळणी केली. मात्र, यामध्ये धक्कादायक सत्य समोर आले असून ३५० पैकी १४८ सोसायट्यांमधील सुरक्षारक्षक गाढ झोपेत होते.

वाकड पोलिसांनी याची दखल घेऊन संबंधित सोसायट्यांच्या अध्यक्षांना ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. कामचुकारपणा करणारे सुरक्षा रक्षक झोपलेले आढळल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करा, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. जेणे करून भविष्यात चोरी आणि दरोड्याच्या घटना घडणार नाहीत. येत्या काही दिवसांत दिवाळीचा सण सुरु होत आहे. त्यानिमित्त काही लोक गावाकडे जातात त्यामुळे चोरांना आपले काम करण्याची संधी उपलब्ध असते. या काळात मोठ्या प्रमाणावर चोरीच्या घटना घडतात, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी सांगितले आहे.