पालकांना खडबडून जाग करणारी घटना पिंपरी-चिंचवड शहरात घडली आहे. एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलाने चार वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार १२ वर्षीय मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दोन्ही मुलांच्या कुटुंबातील सदस्य हे उच्च शिक्षित आहेत.

या धक्कादायक घटनेमुळे पालकांची डोकेदुखी वाढली असून आपली मुलं काय करतात, कुठे जातात, मोबाईलवर काय पाहतात हे पाहणं गरजेचं असल्याचं मत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोनपे यांनी व्यक्त केलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२ वर्षीय अल्पवयीन मुलाने चार वर्षीय अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करत अत्याचार केल्याचं उघड झाले आहे. हा सर्व प्रकार मुलं राहात असलेल्या इमारतीच्या पार्किंगमध्ये घडला आहे. चार वर्षीय मुलाने घडलेला प्रकार त्याच्या बहिणीला सांगितला. बहिणीने पीडित मुलाच्या आईला याची माहिती दिली.

दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून पीडित मुलाच्या आईने पतीला याची माहिती दिली. त्यानंतर, सांगवी पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे. करोनामुळे अनेक शैक्षणिक संस्था बंद असल्याचे ऑनलाइन क्लास असल्याने अवघ्या तीन वर्षांच्या मुलांकडेही मोबाईल पाहायला मिळत आहे. यामुळे मुलं नेमकी काय पाहतात, कुठे जातात, कोणाशी मैत्री करतात हे पाहणं आणि याची माहिती ठेवणं पालकांच कर्तव्य आहे असं मत वरिष्ठ पोलीस निरीक्षक टोपणे यांनी व्यक्त केलं आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक येडे हे करत आहेत.