पिंपरी चिंचवड मधील दिघी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षकासह सहा जणांना पुणे पोलीस आयुक्तांनी निलंबित केले आहे. ही कारवाई बुधवारी (दि.५) करण्यात आली. विशेष म्हणजे या सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जुगार खेळत असलेल्या लोकांवर धाड टाकून सापडलेल्या ८९ हजार रूपये लंपास करत त्यांना धमकावत त्यांच्याकडून आणखी २५ हजार असे १ लाख १४ हजार रुपये उकळले होते. ही घटना ८ ऑक्टबर २०१६ रोजी घडली होती.
दि. ८ ऑक्टोबर रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या टीमने दिघी पोलीस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या डुडुळगाव येथे जाऊन त्या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या लोकांवर आणि अड्ड्यावर धाड टाकली. या सर्व लोकांना दिघी पोलीस स्थानकात आणून त्यांना बसवून ठेवले. तसेच धाडीत मिळालेले ८९ हजार ही रक्कम त्यांना परत न देता. तसेच संशयित आरोपींवर जुगार कायद्याप्रमाणे कारवाई न करता त्यांच्यावर किरकोळ कारवाई केली आणि सोडून दिले.
त्यानंतर सोडून दिलेल्या सदर जुगार अड्डयांवरील जुगार खेळणाऱ्या आरोपींना वेळोवेळी फोन करून त्यांना धमकावत जुगार अॅक्टप्रमाणे कारवाई करेल, अशी धमकी देत त्यांच्याकडून २५ हजार रुपये उकळले. त्यामुळे कर्तव्य बजावताना अत्यंत गंभीर आणि भ्रष्टाचार केला. तसेच नैतिक फायद्यासाठी प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे पुणे पोलीस आयुक्तांनी सहा पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
निलंबित केलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी
१) संतोष काटे (सहाय्यक पोलीस निरीक्षक)
२) सोमनाथ बोऱ्हाडे
३) नामदेव वडेकर
४) विपुल होले
५) शिवराज कलांडीकर
६) परमेश्वर सोनके