पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिसरातील चाकण येथे विद्यार्थ्याने एका शिक्षकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गुरुवारी शिक्षक हर्षल प्रमोदराव राहाटे यांनी चाकण पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विद्यार्थांसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार माराहाण करणारा इयत्ता नववीचा विद्यार्थी असल्याचं समजतं.

चाकणच्या मेदनकरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाला मारहाण करण्यात आली आहे. सविस्तर माहिती अशी की, शिक्षक हर्षल प्रमोदराव राहाटे (वय-२७ रा.धर्मेंद्र नगर, मोशी) हे चाकणच्या मेदनकरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यकरत आहेत. दोन दिवसांपूर्वी मारहाण केलेल्या विद्यार्थाला ‘अभ्यास का केला नाही’ अशी विचारणा शिक्षकाने केली होती. याचाच राग मनात धरून जिल्हा परिषद शाळेजवळ शिक्षक प्रमोद हे दुचाकीवरून जात असताना विद्यार्थी आणि त्यांच्या तीन साथीदाराने त्यांना अडवले. आमच्या मित्राला त्रास कशाला देता? अशी विचारणा करत तिघांनी लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत शिक्षकाच्या डोक्याला आणि पायाला इजा झाली आहे. याप्रकरणी अधिक तपास चाकण पोलीस करीत आहेत.