चिंचवड स्टेशन येथील महावितरणच्या रोहित्राचा स्फोट होऊन एका अपंग चर्मकाराचा होरपळून मृत्यू झाला. तो जळत असताना जिवाच्या आकांताने मदतीसाठी याचना करत होता. मात्र, मदत करण्यास कोणीही पुढे आले नाही. याउलट, बघा जमाव या घटनेचे मोबाईलवरून चित्रीकरण करण्यातच मग्न होता, अशी धक्कादायक माहिती आता पुढे आली आहे. मदतीसाठी दोन पाऊले कोणी पुढे आले असते, तर त्यांचा जीव वाचला असता, अशी भावना मृत्युमुखी पडलेल्या चर्मकाराच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.
पोपट निवृत्ती बनसोडे (वय ५५, रा. इंदिरानगर, चिंचवड) असे होरपळून मृत्युमुखी पडलेल्या चर्मकाराचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अचानक रोहित्राचा स्फोट झाला. त्याआधी बराच वेळ तेथून ठिणग्या पडत होत्या. काही पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या पाहिल्या होत्या. त्यानंतर रोहित्रातील तेल सांडत असल्याचे अनेकांनी पाहिले होते. ते तेल खाली साचलेल्या कचऱ्यावर पडले, त्यामुळे आग लागली. कामात मग्न असलेल्या बनसोडे यांना आगीची कल्पना आली नाही. त्यांच्या अंगावरही तेल सांडले होते. आग भडकली आणि आगीच्या लपेटय़ात ते सापडले. इतरत्र तेल उडाल्याने शेजारी असलेली वाहने आणि खाद्यपदार्थाच्या गाडय़ांनी पेट घेतला. मोठा आवाज झाल्याने नागरिक भयभीत झाले. काही जण तेथून पळाले. बनसोडे हे अपंग असल्याने त्यांना हालचाल करणे जमले नाही. ते जिवाच्या आकांताने मदतीसाठी ओरडत होते. मात्र, तेथे जमा झालेली गर्दी छायाचित्रे काढण्यात व घटनेचे चित्रीकरण करण्यात मग्न होती. अखेर, माणुसकी हरवलेल्या या गर्दीतच त्यांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेने बनसोडे परिवाराला जबर धक्का बसला आहे. शेकडो नागरिक ही घटना उघडय़ा डोळ्यांनी पाहत होते. मात्र, मदतीसाठी कोणी पुढे आले नाही, याची त्यांना मोठी खंत वाटते.
यासंदर्भात, त्यांचा मुलगा सोमनाथ म्हणाला, की आगीने वेढल्यानंतर वडिलांनी जोरजोराने आरडाओरड केली होती. मात्र, मदतीसाठी कोणी आले नाही. बनसोडे यांची मेहुणी अनिता गायकवाड म्हणाल्या, की ते ओरडत राहिले आणि लोक चित्रीकरण करत बसले. त्याऐवजी कुणीतरी पुढे जाऊन मदत केली असती तर ते वाचले असते. पत्नी निर्मला म्हणाल्या, की त्यांच्या निधनानंतर २० हजार रूपयांची मदत देण्यासाठी ‘महावितरण’चे लोक आले होते, ती तुटपुंजी मदत आम्ही नाकारली. त्यांनी आमच्या मुलाला कामावर घ्यावे, अशी आमची मागणी आहे.