पुणे : पिंपरी—चिंचवड शहरातील ५ गिर्यारोहकांनी ‘माउंट मेरा’ या उत्तुंग हिमशिखरावर तिरंगा फडकावला आहे. ‘गिरिप्रेमी’च्या ‘माउंट कांचनगंगा इको इक्स्पिडिशन २०१९’ ला पाठिंबा म्हणून या मोहिमचे आयोजन केले होते.

‘पिंपरी चिंचवड माउंटनियरिंग क्लब’तर्फे या मोहिमेचे आयोजन केले होते. यामध्ये एव्हरेस्टवीर कृष्णा ढोकले याच्या नेतृत्वाखाली डॉ. मिलिंद खाडिलकर, सतीश बुरडे, शिवाजी शिंदे आणि अभिजित लोंढे हे गिर्यारोहक सहभागी झाले होते. या मोहिमेचे नेतृत्व करणारे ढोकले ‘कांचनगंगा इको इक्स्पिडिशन २०१९’च्या चढाई संघाचे सदस्य आहेत. या मोहिमेला ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांचे मार्गदर्शन लाभले.

‘माउंट मेरा’ या शिखराची उंची ६४७० मीटर इतकी असून ते नेपाळमधील हिंकू खोऱ्यात आहे. या शिखरावरील चढाई ही अत्यंत अवघड श्रेणीतील मानली जाते. यासाठी हिमनदीच्या परिसरातून चढाई करावी लागते. हिमनदीतील धोकादायक वाटचाल, विरळ हवामान, उणे तापमान या साऱ्यांचा सामना करत या गिर्यारोहकांनी ‘माउंट मेरा’वर तिरंगा फडकाविला.

या शिखरावरून माउंट एव्हरेस्ट, माउंट ल्होत्से, माउंट च्यो ओयु, माउंट मकालू, माउंट कांचनगंगा या अष्टहजारी शिखरांसह अन्य हिमशिखरांचे विहंगम दृश्य नजरेस पडते.