पिंपरी-चिंचवड शहरात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. सर्वसामान्यांबरोबरच करोना योद्धे म्हणून संबोधल्या जाणाऱ्या पोलिसांमध्येही करोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात एकूण ४६४ जणांना करोनाचा संसर्ग झाला असून, यात अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. तर दोन कर्मचाऱ्यांचा करोनाशी झुंज देत असताना मृत्यू झाला आहे. दरम्यान, अप्पर पोलीस हे देखील करोनाबाधित झाले असून, ते सध्या होम क्वारंटाइन आहेत. शिवाय, दोन पोलीस उपायुक्त बाधित असल्याने अगोदरच त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील बाधित रुग्णांची एकूण संख्या ७५ हजारांच्या उंबरठ्यावर असून ६० हजार पेक्षा अधिकजण करोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, पोलीस दलात करोनाने शिरकाव केला असून संख्या वाढत असल्याने पोलीस दलातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढत आहे. सध्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील ४६४ जण करोनाबाधित असून, यापैकी ४९ अधिकारी आणि ३६८ कर्मचाऱ्यांनी करोनावर मात केली आहे. तर, ४५ कर्मचारी, अधिकारी यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशी माहिती सहायक पोलिस आयुक्त आर. आर. पाटील यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये दोन पोलीस उपायुक्त, पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक यांचा समावेश आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये योग्य ती काळजी न घेतल्यास कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस  कर्मचारी अधिक बाधित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रत्येकाने प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.