शहरातून प्लास्टिक हद्दपार करण्यासाठी आग्रही असलेल्या आयुक्तांना यासंदर्भातील कारवाईत पर्यावरण विभागाचे अधिकारी केवळ कागदी घोडे नाचवत असल्याचे लक्षात आल्याने आयुक्त चांगलेच संतापले. गोलगोल उत्तरे देण्यापेक्षा कामे करा व पुढील बैठकीत अहवाल सादर करा, अशी तंबी त्यांनी दिली.
आठवडाभर परगावी असलेले आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी सोमवारी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. बुधवारी होणारा कामगारांचा नियोजित संप, दहा कलमी कार्यक्रम आदींची माहिती घेतल्यानंतर त्यांनी सर्व विभागांचा आढावा सुरू केला. तेव्हा प्लास्टिक बंदीचे काय झाले, अशी विचारणा त्यांनी पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांच्याकडे केली. दोन महिन्यापूर्वीच प्लास्टिक बंदीचा निर्णय घेण्यात आला. मात्र, अद्याप अपेक्षित कामगिरी नसल्याचे आयुक्तांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानुसार कुलकर्णी संबंधितांच्या बैठका घेतल्याचे सांगू लागले. पुढे काय, कारवाई किती जणांवर केली, असे आयुक्त विचारत होते. कुलकणींच्या उत्तरांनी आयुक्तांचे बिलकूल समाधान झाले नाही. केवळ गोलगोल उत्तरे देऊ नका, अशी तंबी त्यांनी दिली. बैठकांमध्ये नुसतीच चर्चा होते. त्यानुसार कार्यवाही होत नाही, असे त्यांनी सुनावले व पुढील बैठकीत सर्व अहवाल सादर करण्याचे आदेश कुलकर्णी यांना आयुक्तांनी दिले. त्याचप्रमाणे, सहशहर अभियंता अंबादास चव्हाण यांच्यावरही आयुक्त कडाडले. चव्हाण यांनी सादर केलेल्या माहितीत एकवाक्यता नाही. आकडेवारीचा मेळ बसत नाही, अशा बाबी लक्षात आल्याने आयुक्तांनी त्याचा जाब चव्हाण यांना विचारला.