अनधिकृत बांधकामांवरील कारवाई, नियोजनबद्ध कामे व कठोर प्रशासन अशी कामे करताना धडाडी दाखवणाऱ्या पिंपरी पालिका आयुक्तांना सध्या वेगळीच चिंता भेडसावते आहे. एकीकडे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसताना एकापाठोपाठ रिक्त होत चाललेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जागांसाठी सक्षम अधिकारी मिळत नसल्याने आयुक्तांची सध्या शोधमोहीम सुरू आहे.
डॉ. श्रीकर परदेशी यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली, तेव्हापासून त्यांनी विशिष्ट कार्यपद्धतीची चुणूक दाखवली आहे. अनधिकृत बांधकामांवरील कारवाईमुळे त्यांनी लोकप्रतिनिधींशी संघर्ष ओढावून घेतला, तो अजूनही कायम आहे. नियमांवर बोट ठेवत आयुक्तांनी घेतलेल्या अनेक कठोर निर्णयांमुळे पालिकेच्या मनमानी तसेच विस्कळीत कारभाराला बऱ्यापैकी शिस्त लागली आहे. आयुक्तांचे बस्तान बसू लागले असतानाच वरिष्ठ अधिकाऱ्यांची मात्र कमतरता भासू लागल्याने त्यांच्यापुढे वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. अतिरिक्त आयुक्त प्रकाश कदम यांची विभागीय आयुक्त कार्यालयात बदली झाली आहे. मात्र, पर्यायी अधिकारी न मिळाल्याने त्यांना अद्याप सोडण्यात आले नाही. पालिकेतील अनेक महत्त्वपूर्ण विभाग त्यांच्याकडे होते. या पदावर आयएएस दर्जाचा अधिकारी असावा, अशी अपेक्षा आयुक्तांनी यापूर्वीच व्यक्त केली होती. त्यामुळे नवा अधिकारी उपजिल्हाधिकारी असेल की आयएएस, याविषयी तर्क आहेत. सलग चार वर्षे जकात विभागाची जबाबदारी समर्थपणे सांभाळणारे अशोक मुंढे यांना शासन सेवेत जाण्याचे वेध लागले आहेत. आतापर्यंत जकातीच्या भरघोस उत्पन्नावर पिंपरी पालिकेची श्रीमंती अवलंबून होती. मात्र जकात रद्द होऊन एलबीटी लागू होणार असल्याने अपेक्षित उत्पन्न उभारणीचे दडपण पालिकेवर असून हे आव्हान पेलणारा अधिकारी आयुक्तांना मिळालेला नाही.
नागनाथ उमाटे यांच्यानंतर पालिकेला पूर्णवेळ शहर अभियंता नसून महावीर कांबळे यांच्याकडे प्रभारी कार्यभार आहे. मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारीपदावरून डॉ. आनंद जगदाळे निवृत्त झाल्यानंतर त्या पदासाठी योग्य अधिकारी मिळत नव्हता. डॉ. श्याम गायकवाड यांना सूत्रे घेण्यास सांगण्यात आले, तेव्हा त्यांनी ‘नन्ना’ चा पाढा सुरू केला. आयुक्तांनी ‘आदेश’ देऊन ही जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली. यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या मुख्य अधीक्षकपदासाठी अनेकांच्या मुलाखती झाल्या. मात्र, कोणाचीच वर्णी न लागल्याने गायकवाड यांच्याकडेच कार्यभार देण्यात आला. आता तेही निवृत्तीच्या उंबरठय़ावर असल्याने मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारीपदाचा तोच प्रश्न नव्याने निर्माण होणार आहे. ३१ मार्चला निवृत्त होणाऱ्या सहआयुक्त अमृत सावंतांकडील प्रशासन विभाग काढून घेण्यात आला. यापुढे  सहआयुक्त पदावर पांडुरंग झुरे यांची वर्णी अपेक्षित होती. मात्र, सावंतांच्या जागी डॉ. उदय टेकाळे प्रशासनात आल्याने झुरेंच्या संभाव्य नियुक्तीला खोडा बसण्याचे संकेत आहेत. विद्युत विभागातील सहशहर अभियंता प्रवीण तुपे यांच्याकडे ‘सायन्स पार्क’ ची जबाबदारी आहे. महावीर कांबळे यांच्याकडील ‘बीआरटीएस’ चे काम काढून घेत सहशहर अभियंता राजन पाटील यांच्याकडे देण्यात आले. तर, सावंतांना जाता-जाता भांडार विभागात बसवण्यात आले आहे. संजय कुलकर्णी यांच्यावर सातत्याने होत असलेल्या आरोपांमुळे पालिकेचेच ‘पर्यावरण’ बिघडले आहे. अशा अनेक चिंता आयुक्तांसमोर आहेत. तोडगा मात्र दृष्टिपथात नाही.