पिंपरी पालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी सुरू केलेल्या अनधिकृत बांधकामे पाडण्याच्या मोहिमेत आतापर्यंत शहारातील ३०० इमारती पाडल्या असून वाढता व तीव्र विरोध असूनही आयुक्त या कारवाईवर ठाम असल्याचे दिसून येत आहे.
चिंचवड-मोहननगर येथील नाल्यावरील अनधिकृत बांधकामे तोडण्याची कारवाई गुरूवारी झाली, त्यामुळे स्थानिक रहिवाशांचा तीव्र उद्रेक झाला. त्यांनी पालिका मुख्यालयात येऊन आयुक्तांच्या मोटारीवर हल्ला चढवला. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली. या प्रकरणातील आंदोलकांना पोऋलसांनी ताब्यात घेऊन सायंकाळी सोडून दिले. या आंदोलनानंतरही आयुक्तांनी ही मोहीम कायम ठेवण्याचे संकेत दिले आहेत.
पिंपरी पालिकेत रूजू झाल्यानंतर जून २०१२ मध्ये आयुक्तांनी अनधिकृत बांधकामांच्या विरोधात पहिली कारवाई केली होती. तेव्हापासून आतापर्यंत शहरातील ३०० अनधिकृत इमारती आयुक्तांनी पाडल्या आहेत. बहुतांश वेळी कारवाईला तीव्र स्वरूपाचा विरोध झाला आहे. या पाडापाडीस राजकीय पक्ष, नगरसेवकांचा तीव्र विरोध असून त्यावरून पालिकेच्या राजकारणात आयुक्त विरूध्द लोकप्रतिनिधी असा संघर्ष सुरू आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने आयुक्तांच्या विरोधात उघड मोहीमच उघडली असून त्यांना कोणतेही सहकार्य न करण्याचा पवित्रा घेतला असल्याचे दिसून येते. मात्र, तरीही आयुक्तांनी ही मोहीम सुरूच ठेवली आहे. अनधिकृत बांधकामे पाडण्याची धास्ती नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे असुरक्षिततेच्या भावनेतून ते हिंसक होऊ लागल्याचे गुरूवारच्या घटनेवरून दिसून येते. याशिवाय, अनधिकृत बांधकामे केलेल्या नागरिकांच्या विरोधात गुन्हे दाखल करणे, त्यांच्या नागरी सुविधा बंद करण्याची कारवाई सुरूच आहे. त्यावरूनही नागरिकांमध्ये मोठय़ा प्रमाणात रोष आहे.