शहरातील विकासकामे ठप्प झाल्याच्या नगरसेवकांच्या तक्रारी, नव्या गावांना निधीच दिला जात नसल्याची ओरड, डॉ. श्रीकर परदेशी यांच्या बदलीनंतर सैल सुटलेले कर्मचारी व अधिकारी व एकूणच विस्कळीत कारभार यासारख्या तक्रारींची दखल घेतानाच स्वत:ची ‘प्रतिमा बांधणी’ करण्याच्या हेतूने आयुक्तांनी सोमवारपासून शहराचा पाहणी दौरा सुरू केला. पहिल्याच दिवशी चिंचवड परिसरात त्यांनी केलेल्या पाहणीत समस्यांची जंत्री त्यांना ऐकावी लागली.
सकाळी साडेआठ वाजता सुरू झालेला हा दौरा साडेअकरापर्यंत चालला. त्यानंतर, क्षेत्रीय कार्यालयात आयुक्तांनी बैठक घेतली. स्वच्छता, आरोग्य, पदपथ, अनावश्यक तारा, जाहिरातींचे अतिक्रमण याबाबतच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. माजी महापौर अपर्णा डोके, अश्विनी चिंचवडे, संदीप चिंचवडे, अनंत कोऱ्हाळे, नीलेश बारणे, माया बारणे, शमीम पठाण, आशा सूर्यवंशी, विमल जगताप, संपत पवार, यमुना पवार, शेखर ओव्हाळ, अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे आदी यावेळी उपस्थित होते. या वेळी उत्सुकतेपोटी नागरिकांनी गर्दी केली होती.
परदेशींच्या बदलीनंतर पालिकेचे वातावरण बदलले आहे. आयुक्तांना रुजू होऊन महिना होत आला तरी कामाची घडी अद्याप बसलेली नाही. रूजू होताच आयुक्तांना अंदाजपत्रकाला सामोरे जावे लागले. बजेटची पळवापळवी, त्यावरून नाराजी नाटय़ असे बरेच उद्योग झाल्यानंतर ते मंजूरही झाले. आयुक्तांनी बैठकांचा सपाटा लावून अधिकाऱ्यांकडून सद्य:स्थितीची माहिती घेतली. त्याची पडताळणी या दौऱ्यात ते करणार आहेत. सभेतील चर्चेत शहरातील विकासकामे ठप्प झाली, विशेषत: नव्या गावातील कामांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी झाल्या. कुदळवाडीचे मनसेचे नगरसेवक राहुल जाधव यांनी नव्या गावांवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ उपोषण केले. या पाश्र्वभूमीवर, आयुक्तांनी दौरा सुरू केला असून तो ८ मार्चपर्यंत चालणार आहे. आयुक्तांचा दौरा नागरी सुविधांचे प्रश्न जाणून ते सोडवण्यासाठी असल्याचे अधिकारी सांगत असले तरी त्यामागे आयुक्तांची ‘प्रतिमा बांधणी’ हे कारण असल्याचे मानले जाते.