लष्काराच्या ताब्यात असलेल्या मात्र मूळच्या भूमिपुत्रांच्या जमिनी पिंपरी महापालिकेला विकासकामांसाठी देताना लष्कराला टप्प्याटप्प्याने तब्बल १५८ कोटी रुपये देण्यात येणार आहेत, त्यास काँग्रेसचा तीव्र विरोध असल्याचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. लष्कराने अडवणुकीची भूमिका घेऊ नये, या ठिकाणी पाकिस्तानी राहत नाहीत, असे सांगत याप्रकरणी संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर यांच्याकडे दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बऱ्याच वर्षांपूर्वी शहरातील स्थानिक नागरिकांच्या जमिनी लष्कराने घेतल्या आहेत. बोपखेल, तळवडे, भोसरी, िपपळे निलख आदी अनेक भाग लष्कराच्या विळख्यात आहेत. अलीकडेच रस्तारुंदीकरण तसेच अन्य विकासकामांसाठी काही महापालिकेला जागांची आवश्यकता होती. या जागांची मागणी महापालिकेने केली, तेव्हा प्रारंभी लष्कराने नकारघंटा दर्शवली. मात्र, नंतर आर्थिक मोबदला देण्याची तयारी पालिकेने दाखवल्यानंतर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. अशा जागांसाठी जवळपास १५८ कोटी रुपये लष्कराला देण्यात येणार आहेत. आतापर्यंत १११ कोटी रुपये देण्यात आल्याचे सांगण्यात आले. अशाप्रकारच्या व्यवहारालाच आमचा तीव्र विरोध असल्याचे साठे यांनी म्हटले आहे. ही रक्कम शहरातील विकासकामांसाठी वापरता आली असती, मात्र, ते पैसे लष्कराला देण्यात येत आहेत. वास्तविक संरक्षण खात्याची ही भूमिका अडवणुकीची आहे, लोकप्रतिनिधी तसेच आयुक्तांनी मौन का धारण केले आहे, असा मुद्दा उपस्थित करत आम्ही याप्रकरणी संरक्षणमंत्र्यांकडे दाद मागू, वेळप्रसंगी संघर्षांची भूमिका घेऊ, असे साठे यांनी नमूद केले.

‘..तो कायदा शेतकरीविरोधी’
भाजप सरकारने आणलेला भूमी अधिग्रहण कायदा हा शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरवणारा असून उद्योगपतींचे हित साधणारा आहे, त्या विरोधात युवा काँग्रेस तीव्र आंदोलन करणार असल्याचे नरेंद्र बनसोडे, संकेत जगताप, चिंतामणी सोंडकर, मयूर जयस्वाल, अभिजित गोफण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.