पिंपरी-चिंचवड शहरात करोना विषाणूचा प्रसार मोठ्या वेगाने होत असून जून अखेरीस ३ हजार करोना बाधितांची संख्या होती, ही संख्या १० जुलै आजच्या दिवशी ६ हजार ५४९ वर पोहचली आहे. म्हणजे अवघ्या दहा दिवसांमध्ये शहरातील रुग्ण हे दुप्पट वाढले आहेत. हा रुग्ण वाढीचा वेग चिंता व्यक्त करणारा आहे असे महानगर पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले आहेत. ते नागरिकांशी फेसबुकद्वारे थेट संवाद साधत होते. तेव्हा ते बोलत होते.

सध्या पिंपरी-चिंचवड शहरातील करोना बाधितांची संख्या ६ हजार ५४९ पोहचली आहे. हा प्रसार खूप वेगाने वाढत आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, करोनाची लस निघत नाही तोपर्यंत आपल्याला करोना सोबत जगायचं आहे. बाहेर जात असताना नागरिकांनी मास्क वापरले पाहिजे, मास्कच करोना पासून आपलं रक्षण करू शकतो.

एकूण आकड्या पेक्षा अॅक्टिव्ह रुग्ण महत्वाचे असून करोना मुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या साडेतीन हजारांच्या पुढे आहे. ही संख्या खूप मोठी आहे असंही ते म्हणाले. पिंपरी-चिंचवड शहरातील ६० टक्के नागरिकांनी करोना विषाणूवर मात केली आहे. तर ४० टक्के ऍक्टिव्ह केसेस आहेत. ऍक्टिव्ह रुग्ण असलेल्या ८० टक्के रुग्णामध्ये लक्षण नाहीत. मात्र, ते करोना पॉझिटिव्ह आहेत. शहरातील नागरिक मास्क वापरताना दिसत नाहीत, सोशल डिस्टसिंग त्याचं पालन होत नाही. मास्कचा गैरवापर केला जात आहे. मास्क गळ्यावर काढून ठेवला असल्याचं अनेक वेळा समोर आले. अश्या प्रकारे नागरिक वागत असतील तर करोना प्रादुर्भाव वाढू शकतो. अशी नाराजी देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

पुढे ते म्हणाले, करोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाउन असणार आहे. लॉकडाउनचा निर्णय घेत असून नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे अस ही आयुक्त म्हणाले.

दहा दिवसात पिंपरी-चिंचवडमध्ये दुप्पट करोना बाधित

३०  जून रोजी शहरातील बाधित रुग्णांची संख्या ३ हजार २९ एवढी होती. आज १०  जुलै रोजी ६ हजार ५४९ एवढी झाली आहे. म्हणजे अवघ्या दहा दिवसांत शहरातील रुग्णांची संख्या दुप्पट झाल्याचे स्पष्ट होत आहे.