िपपरी पालिकेच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर दोन इंग्लिश शाळा शहरातील आघाडीच्या ‘थरमॅक्स’ कंपनीला ३० वर्षांच्या करारावर दत्तक देण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव पालिका सभेत मांडण्यात आला असून तेथे मान्यता मिळाल्यानंतर कंपनीकडून येत्या जूनपासून वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.
महापालिका हद्दीतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या दर्जात्मक शिक्षणासाठी थरमॅक्स सोशल इनिशिएटिव्ह फाउंडेशन, आकांक्षा फाउंडेशन व महापालिका यांच्यात शाळा दत्तक घेण्याचा करार होत आहे. २०१३-२०१४ या वर्षांसाठी हे वर्ग सुरू होणार असून कंपनीला सशर्त परवानगीने शाळा देण्यात येणार आहेत. ३ जानेवारीला शिक्षण मंडळाच्या बैठकीत यास मान्यता देण्यात आली. आता २० मार्चला होणाऱ्या सभेत यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. शिक्षण मंडळाच्या १३४ प्राथमिक शाळा असून पहिली ते सातवीपर्यंतचे विद्यार्थी त्यात शिक्षण घेतात. त्यापैकी दोन शाळा सेमीइंग्लिश असून त्यांचा दर्जा सुमार आहे. इंग्लिश शाळा सुरू करण्याचे पालिकेने आतापर्यंत केलेले प्रयत्न विविध कारणांमुळे प्रत्यक्षात उतरलेले नाहीत. त्यामुळे पालिकेने आता खासगी कंपन्यांचा पर्याय पुढे केला आहे.
थरमॅक्स ही पारंपरिक ऊर्जा संवर्धनामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपनी असून सामाजिक जबाबदारी म्हणून कंपनीच्या ‘सीएसआर’ विभागातर्फे व आकांक्षा फाउंडेशन व ‘टीच फॉर इंडिया’ या संस्थेच्या सहकार्याने या शाळा चालवण्यात येणार आहेत. िपपरीत तपोवन मंदिराजवळील पालिका शाळा व कासारवाडीतील छत्रपती शाहू महाराज विद्यालयाची कंपनीने निवड केली आहे. आर्थिकदृष्टय़ा मागास विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळणार आहे. महापालिकेसाठी १० टक्के जागा राखीव ठेवण्याचे नियोजन असून शिक्षण मंडळाकडून त्या जागांची शिफारस करण्यात येणार आहे. कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबीयासांठी या शाळा असतील, असे कंपनीने तर प्रवेशशुल्क व देणगीचा प्रकार या शाळांमध्ये होणार नसल्याचे पालिकेने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. तथापि, याबाबतचे अंतिम धोरण पालिका सभेत ठरणार आहे.