पिंपरीतील दिघी येथील गायींची कत्तल आणि गोमांसची तस्करी प्रकरणात आता नवीन माहिती समोर आली आहे. मॅगझिन चौक परिसरात राहणाऱ्या दुबे कुटुंबाच्या तीन गायी चोरुन त्यांची तस्करांनी कत्तल केली, असा आरोप केला जात असून दुभत्या गायींची कत्तल झाल्याने दुबे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.

मॅगझिन चौक परिसरात सुनील दुबे हे त्यांची पत्नी मैना दुबे, मुलगा शिवा व कृष्णा, मुलगी शीतल यांच्यासह पत्र्याच्या खोलीत राहतात. मैना दुबे या गृहिणी आहेत. हे कुटुंब मूळचे बनारसचे असून पोटाची खळगी भरण्यासाठी ते पिंपरी-चिंचवड मधील दिघी येथे काही वर्षांपूर्वी आले. दुबे यांनी मित्र मंडळींकडून पैसे जमा करून काही महिन्यांपूर्वी एक जर्सी गाय घेतली. ती तब्बल १५ लिटर दुध देत होती. तिला जोडी म्हणून त्यांनी आणखी एक गाय घेतली. ती देखील ७ लिटर दुध द्यायची. असं करत करत दुबे कुटुंबाकडे चार गायी झाल्या. मात्र त्यातील एका गायीचा मृत्यू झाला. तर आणखी एक गाय चोरीला गेली. शेवटी दुबे कुटुंबाकडे दोन गायी राहिल्या. जर्सी गायीचे दुध विकून मिळालेल्या पैशातून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागत होता. सुनील दुबे यांची तिन्ही मुलं शाळेत जातात. शिवा दहावीत, कृष्णा सहावीत तर शीतल नववी इयत्तेत शिकत आहे. यातूनच त्यांच्या शिक्षणाचा खर्च देखील भागत होता.

परंतू, रविवारी मध्यरात्री घरासमोरील गोठ्यातून दोन्ही दुभत्या जर्सी गायी चोरील्या गेल्या, असा कुटुंबियांचा आरोप आहे. या गायींची कत्तल झाल्याचा दावा मैना दुबे यांनी ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना केला.

गायींची कत्तल झाल्याने या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. ज्या गोठ्यात दोन जर्सी गाय असायच्या त्या ठिकाणी शांतता आहे. आता उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न कुटुंबियांना पडला आहे. एक महिन्यापूर्वी चोरीला गेलेली गाय देखील अशाच प्रकारे तिची कत्तल झाली असावी असा संशय देखील मैना दुबे यांनी व्यक्त केला आहे.

याबाबत पोलिसांना विचारले असता दिघी येथील पोलीस निरीक्षक राजेंद्र काळे म्हणाले, या प्रकरणाचा तपास सुरु आहे. या प्रकरणी मुंबईतील वांद्रे येथून अब्दुल रहीम करीम कुरेशी (वय ३२) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची कसून चौकशी सुरु असून सखोल तपासानंतर अन्य आरोपींची नावेही उघड होतील, असे त्यांनी सांगितले.