पिंपरी- चिंचवडमध्ये गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी वर्गणीची ‘वसूली’ करण्यासाठी एका दुकानाची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनीही या प्रकरणी तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिल्याचा आरोप दुकानदाराने केला आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या नावाखाली खंडणी वसूल केली जाते की काय, असा सवाल नागरिक विचारत आहेत.

यमुना नगरमधील माताजी सुपर मार्केट या दुकानात रविवारी रात्री एका गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते गेले. त्यांनी दोन हजार रुपयांची वर्गणी द्यावी, असा तगादा लावला. मात्र, मालक आल्यावर या किंवा त्यांच्याशी फोनवर बोलून घ्या, असे दुकानातील कर्मचाऱ्यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना सांगितले. यानंतर मंडळाचे कार्यकर्ते संतापले आणि त्यांनी दुकानाच्या काऊंटरची तोडफोड केली व तिथून पळ काढला. या प्रकरणी दुकानाच्या मालकाने रात्री निगडी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेण्यास नकार दिला, असा आरोप दुकानदाराने केला आहे.