आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोविड रुग्णासाठी थेट डॉक्टरांना फोन करून रुग्णालयात दाखल करून घेण्यास सांगितल्याची घटना आज पहावयास मिळाली. अवघ्या राज्याच्या आरोग्य यंत्रणेचा भार त्यांच्यावर असतानाही त्यांनी तत्परता दाखवत रुग्णाला बेड मिळवून दिला आहे. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून प्लाझ्मा देण्यात आला आहे अशी माहिती डॉक्टर विनायक पाटील यांनी दिली आहे.

यावेळी आरोग्यमंत्री टोपेंनी डॉक्टर पाटील यांना स्वतःची आणि कर्मचाऱ्यांची काळजी घेण्यास सांगून, त्यांच्या कामाचे कौतुक देखील केले.

पिंपरी-चिंचवड शहरात करोना महामारीने अक्षरशः थैमान घातले आहे. दररोज अडीच हजारांच्या जवळ रुग्ण आढळत असून मृत्यूचा आकडा देखील वाढला असल्याचं गेल्या काही दिवसांपासून स्पष्ट होत आहे. अनेकांना बेड मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. दरम्यान, आज एका कोविड रुग्णाला बेड मिळत नसल्याने त्याने थेट आरोग्यमंत्र्यांशी संवाद साधला यानंतर त्यांनी स्वतः माणुसकीच्या नात्यातून वायसीएममधील डॉ. विनायक पाटील यांना फोन करून रुग्णाला तातडीने बेड देण्यास सांगितले. त्यानंतर रुग्णाला तातडीने भोसरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं व त्यावेळी प्रकृती गंभीर असल्याने रूग्णाला तातडीने प्लाझ्मा देखील देण्यात आला. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ. विनायक  पाटील यांनी दिली आहे.