अभ्यासाच्या नावाखाली सहलीची परंपरा कायम
करदात्या नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी करत विविध अभ्यासदौऱ्यांच्या नावाखाली आयोजित करण्यात येणाऱ्या सहलींची परंपरा कायम राखत पिंपरी पालिकेचे नगरसेवक व अधिकाऱ्यांचे चौदा जणांचे एक पथक आठवडय़ाभरासाठी सिक्कीमच्या ‘अभ्यास’दौऱ्याला निघाले आहेत. यासाठी जवळपास साडेआठ लाख रूपये खर्च करण्यात येणार आहेत. राष्ट्रवादीचे नेते व माजी खासदार श्रीनिवास पाटील हे सिक्कीम येथे राज्यपाल आहेत, हा या दौऱ्याचा जुळून आलेला ‘योगायोग’ आहे.
पिंपरी पालिकेच्या वतीने ठरावीक कालावधीनंतर सदस्य व अधिकाऱ्यांचे अभ्यास दौरे आयोजित केले जातात. अभ्यासाच्या नावाखाली सरळसरळ सहलींची मौजमजा केली जाते, हे उघड सत्य आहे. दौऱ्यातून परतल्यानंतर नेमका काय अभ्यास केला, याची माहिती कधीही दिली जात नाही. दौऱ्याचा खर्च पालिकेकडून केला जातो, मात्र दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी स्वत:च्या खिशातून खर्च करणार असल्याचा दावा पदाधिकारी करतात. नंतर, सोयीस्करपणे पालिकेकडे ती बिले सादर केली जातात, हा वर्षांनुवर्षे सुरू असलेला प्रकार असून यंदाचा महापौरांचा दौराही त्यास अपवाद असण्याचे कारण नाही. विद्यमान महापौर धराडे यांनी आपल्या कारकिर्दीत बरेच ‘अभ्यास’ दौरे केले असून त्यातून झालेला अभ्यास कधीही उजेडात आला नाही. यापूर्वीच्या महापौरांची परंपराच धराडे यांनीही कायम ठेवली आहे.
महापौरांच्या नेतृत्वाखाली येत्या ८ ते १३ मे दरम्यान असे सहा दिवस नव्याने सिक्कीम दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्यात तेथील प्रकल्पांची पाहणी करण्यात येणार असल्याचे याबाबतच्या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात तेथे काय अभ्यास होणार, हे उघड गुपित आहे. महापालिकेची जैवविविधता समिती, विधी समितीचे सदस्य, काही वरिष्ठ अधिकारी असे १४ जण या दौऱ्यात सहभागी होणार आहेत, त्यासाठी साडेआठ लाख रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंगळवारच्या सभेत मांडण्यात आला होता. तथापि, २४ तास पाणीपुरवठा करण्याच्या २०८ कोटींच्या प्रस्तावातील टक्केवारीवरून सदस्यांनी ही सभाच तहकूब केली. आता शुक्रवारी (६ मे) होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेत हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. स्थायी समितीकडून खर्च मंजूर होण्यापूर्वीच सहभागी नगरसेवक व अधिकाऱ्यांकडून सिक्कीमला जाण्याची जवळपास सर्वच तयारी झाल्याचे सांगण्यात येते. सदस्यांच्या खर्चासाठी नगरसचिव विभागाकडील ‘अभ्यासदौरा व प्रशिक्षण’ या लेखाशीर्षांतून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. तर, अधिकाऱ्यांचा खर्च पर्यावरण विभागातील ‘अभ्यास दौऱ्यासाठीचा’ या लेखाशीर्षांतून केला जाणार आहे. शहरात पाणीटंचाईची परिस्थिती आहे. दिवसाआड पाणीपुरवठा करताना २५ टक्क्य़ांपर्यंत कपात केली जात आहे. नवे महापालिका आयुक्त रुजू झाले, त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे मुख्य पदाधिकारी गैरहजरच राहिले. अशा परिस्थितीत, िपपरी पालिकेतील सदस्य व अधिकाऱ्यांची संयुक्तपणे निघालेली ‘उन्हाळी सहल’ चर्चेत आली आहे.