जकात रद्द करून एलबीटी (स्थानिक संस्था कर) लागू करण्याच्या शासन निर्णयास पिंपरी महापालिका कर्मचारी महासंघाने तीव्र विरोध दर्शवला असून एक एप्रिलपासून बेमुदत पालिका बंद करण्याचा इशारा दिला आहे.
महासंघाचे अध्यक्ष बबनराव झिंजुर्डे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. महापालिकेला उत्पन्नाचे स्रोत्र हवे आहे. ज्या ठिकाणी एलबीटी लागू केली, तेथील परिस्थिती भयावह आहे. एलबीटीमुळे पिंपरी पालिकेला अपेक्षित उत्पन्न मिळणार नाही. त्यामुळे विकासकामे होणार नाहीत. कामगारांच्या पगाराचाही प्रश्न निर्माण होईल. दुसरीकडे, उत्पन्नासाठी नागरिकांच्या मिळकतकरात सतत वाढ करण्यात येत आहे. जकात रद्द करणे हा पालिकांच्या स्वायत्ततेवर घाला आहे. जकात ठेवा, एलबीटी रद्द करा, अशी महासंघाची भूमिका असल्याचे झिंजुर्डे यांनी सांगितले.
दरम्यान, सोमवारपासून एलबीटीची नोंदणी सुरू झाली. पहिल्या दिवशी याबाबतच्या प्रक्रियेत ३२५ जणांनी सहभाग घेतला असल्याची माहिती जकात अधीक्षक अशोक मुंढे यांनी दिली. मुख्यालय, प्रभाग कार्यालयात तसेच ऑनलाइन पद्धतीने व्यापाऱ्यांनी नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे. अधिकाधिक व्यापाऱ्यांनी आपली नोंदणी करावी, असे आवाहन मुंढे यांनी केले आहे.
 अध्यक्षपदाची निवडणूक एक एप्रिलला
स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक एक एप्रिलला होणार आहे. अध्यक्षपदासाठी सत्तारूढ राष्ट्रवादीने इच्छुकांकडून अर्ज मागविले आहेत. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार अंतिम शिक्कामोर्तब करणार आहेत. नवनाथ जगताप व महेश लांडगे यांच्यात तीव्र चुरस आहे. अजितदादांचे यापूर्वीचे धक्कातंत्र पाहता दोघांच्या भांडणात तिसऱ्याला संधी मिळण्याची शक्यताही नाकारता येत नाही.