11 December 2017

News Flash

पिंपरी पालिकेतील भाजप नेत्यांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती

जवळपास तीन तास चाललेल्या या बैठकीत विषयानुसार अधिकाऱ्यांना फैलावर घेण्यात आले.

प्रतिनिधी, पिंपरी | Updated: October 5, 2017 5:18 AM

पिंपरी पालिकेतील गेल्या सहा महिन्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी विभागप्रमुखांची बैठक घेण्यात आली. या वेळी महापौर नितीन काळजे, आयुक्त श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते.  

कामचुकारपणा केल्यास कारवाईचा आयुक्तांचाही इशारा

पिंपरी पालिका ताब्यात येऊन सहा महिने झाले, तरी मनासारखी कामे होत नाहीत, म्हणून वैतागलेल्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेत सर्वानाच फैलावर घेतले. सत्तांतर झाल्याने अस्वस्थ झालेल्या अधिकाऱ्यांनी विकासकामांमध्ये खोडा घालण्याचे उद्योग बंद करावेत, कार्यपद्धतीत सुधारणा करावी, अशी तंबी पदाधिकाऱ्यांनी दिली. तर, रखडलेली कामे तातडीने पूर्ण करा, असे सांगत कामचुकारपणा केल्यास कठोर कारवाई करावी लागेल, असा इशारा आयुक्तांनीही दिला.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालिका मुख्यालयात येऊन अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतल्याने अस्वस्थ झालेल्या भाजप नेत्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या उपस्थितीत विभागप्रमुखांची आढावा बैठक घेतली. महापौर नितीन काळजे, पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे, नगरसेवक नामदेव ढाके आदी उपस्थित होते. जवळपास तीन तास चाललेल्या या बैठकीत विषयानुसार अधिकाऱ्यांना फैलावर घेण्यात आले. मोकाट कुत्री व जनावरांच्या विषयावरून डॉ. सतीश गोरे यांची, एलईडी दिवे व विद्युत विभागातील संथ व नियोजनशून्य कारभारावरून प्रवीण तुपे यांची कानउघडणी करण्यात आली. त्याच पद्धतीने, सुरेश साळुंके यांना उद्यानांच्या सद्य:स्थितीवरून, संजय कुलकर्णी यांना पर्यावरण विभागातील निष्काळजीपणाबद्दल फटकारण्यात आले. चंद्रकांत इंदलकर यांची कामगारांच्या विमा योजनेवरून, डॉ. मनोज देशमुख यांची यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील विस्कळीत व अनागोंदी कारभारावरून, रवींद्र दुधेकर यांची पाणीपुरवठय़ावरून तर विजय खोराटे यांची स्वच्छतेवरून झाडाझडती घेण्यात आली. नगररचना विभागातील मनमानी व उशिराने होणाऱ्या कामांमुळे प्रकाश ठाकूर यांना खडसावण्यात आले. वैद्यकीय विभागाच्या कामकाजावरून पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मात्र, या विभागाचे प्रमुख डॉ. अनिल रॉय व डॉ. पवन साळवे दोघेही गैरहजर होते.

जागोजागी असलेले फ्लेक्स काढा, रस्त्यावरील खड्डे बुजवा, कर्मचाऱ्यांना गणवेश सक्तीचा करा, भंगार साहित्याची विल्हेवाट लावा, मुख्यालयातील उपाहारगृहाचा दर्जा सुधारावा, क्रीडा विभागाचे स्थलांतर मुख्यालयात करावे.

नितीन काळजे, महापौर, पिंपरी

शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा, वापरात नसलेल्या मिळकती भाडेतत्त्वावर द्याव्यात, वेळच्या वेळी कचरा उचलण्यात यावा, उद्यानांमध्ये चांगल्या सुविधा द्याव्यात, एलईडी दिव्यांची देखभाल करावी, वैद्यकीय विभागाचा कारभार सुधारावा.

एकनाथ पवार, पक्षनेते, पिंपरी पालिका

पिंपरीतील आंबेडकर चौकात फ्लेक्स लावणाऱ्यांवर कारवाई करावी. निगडी-दापोडी बीआरटी मार्ग खुला करावा. डेअरी फार्म येथील रस्ता ताब्यात घ्यावा. अग्निशामक दलाचे मुख्यालयात स्थलांतर करावे.

सीमा सावळे, स्थायी समिती अध्यक्षा

आढावा बैठकीत झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी करावी. पदाधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे. वेगाने कामे पूर्ण करावीत. कामात सुधारणा करावी. दिरंगाई केल्यास अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.

श्रावण हर्डीकर, आयुक्त, पिंपरी पालिका

First Published on October 5, 2017 5:18 am

Web Title: pimpri municipal corporation officials bjp leader