पुण्यात पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याच्या टाकीचा व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले असतानाच शुक्रवारी सकाळी पिंपरी- चिंचवडमधील फुगेवाडीतही व्हॉल्व्हमध्ये बिघाड झाल्याने हजारो लिटर वाया गेले. एकीकडे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमध्ये कमी पाणी पुरवठा होत असताना अशा पद्धतीने पाणी वाया जात असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

दापोडी फुगेवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत असून यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अशी परिस्थिती असताना दुसरीकडे मंगळवारी सकाळी फुगेवाडील जववाहिनीवरील व्हॉल्व्हमध्ये बिघाड झाला. यामुळे हजारो लीटर पाणी वाया गेले. यामुळे परिसरातील फुटपाथ जलमय झाले होते. या प्रकारावर नागरिकांनी संताप व्यक्त केला.

दरम्यान, गुरुवारी पुण्यात पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याच्या टाकीचा व्हॉल्व्ह नादुरुस्त झाले होते. महापालिकेच्या प्रमुख जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे गुरुवारी पहाटे खडकवासाला ते पर्वती या दरम्यानच्या १ हजार ६०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह बंद करण्यात येणार होते. मात्र अचानक व्हॉल्व्हमध्ये बिघाड झाला आणि काही कळण्याच्या आता लाखो लिटर पाणी सिंहगड रस्त्यावर येण्यास सुरुवात झाली. सिंहगड रस्त्यावरील आसपासच्या काही सोसायटय़ांमध्ये पाणी शिरले होते.