पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातून मोटारीच्या काचा फोडून लॅपटॉप पळवणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा युनिट ४ च्या पथकाने अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध घेत असताना तब्बल शंभर सीसीटीव्हीचं फुटेज तपासून आरोपींचा शोध लावला आहे. या प्रकरणी लॅपटॉप चोरणारे ३ आणि चोरीचे लॅपटॉप विकत घेणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून पोलिसांनी महागडे १८ लॅपटॉप आणि वाय-फाय डोंगल, कॅमेरा, दोन दुचाकी असा १२ लाख ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तपासाअंती या टोळीवर १३ गुन्हे दाखल असल्याचं निष्पन्न झालंय. या प्रकरणी गणेश उर्फ नाना माणिक पवार, बबन काशिनाथ चव्हाण आणि बसू जगदीश चव्हाण अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. चोरीचे लॅपटॉप विकत घेणाऱ्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, इतर दोन जण आरोपी फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात सराईत आरोपींनी दीड वर्षांत मोटारीच्या काचा फोडून लॅपटॉप पळवल्याचे ३० गुन्हे केले होते. त्याचा तपास गुन्हे शाखा युनिट चार चे पथक करत होते. हिंजवडी परिसरातून एका मोटारीची काच फोडून लॅपटॉप लंपास केला होता. त्या आरोपींचा शोध घेत असताना शंभर सीसीटीव्ही युनिटचं फुटेज पोलिसांनी तपासलं आणि आरोपींचा शोध घेतला. या प्रकरणी गणेश पवार याला मुंबईमधून तर इतर दोघांना सोलापूरमधून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील दोघांना चोरी केलेले लॅपटॉप विकल्याच समोर आले.

यानंतर पोलिसांनी चोरीचे लॅपटॉप विकत घेणाऱ्यांनाही ताब्यात घेतलंय. आरोपींकडून पोलिसांनी १२ लाख ७७ हजारांचे महागडे १८ लॅपटॉप जप्त केले आहेत. दरम्यान, यातील आरोपी गणेश याने गेल्या वर्षी गोवा राज्यात जाऊन तिथे देखील अश्याच पद्धतीने मोटारीच्या काचा फोडून लॅपटॉप चोरल्याचे सांगितले आहे. त्याच्यावर मुंबईमध्ये २४ गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट चार चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने केली आहे.