पिंपरी-चिंचवड परिसरात मोबाईलवर बोलत पायी चालत जाणाऱ्या नागरिकांचे मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या दोघांना भोसरी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ४ लाख ११ हजार रुपयांचे २८ मोबाईल हस्तगत केले आहेत. याप्रकरणी सलमान ख्वाजा काझी, आणि शुभम मारुती हिरवे या दोन आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी एमआयडीसी पोलीस हे मोबाईल चोरी प्रकरणी आरोपींचा शोध घेत होते. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार हे आरोपी दिघी, भोसरी रोड परिसरातील असल्याचं समजलं. यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं. अधिक चौकशी केली असता दोन्ही आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. मोबाईलवर बोलत पायी चालत जाणाऱ्या व्यक्तींचे मोबाईल हिसकावून पळून जात असल्याचं आरोपींनी कबूल केलं. पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून २८ मोबाईल हस्तगत केले आहेत.

सदरची कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंडे कुंटे, गुन्हे पोलीस निरीक्षक सतीश नांदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रावसाहेब वाबळे यांच्या पथकातील पोलीस कर्मचारी सुभाष भांबुरे, रहीम शेख, अनिल जोशी, विशाल काळे, रवींद्र तिटकारे, विजय दौंडकर, करण विश्वासे, यांनी केली आहे. दरम्यान, ज्या नागरिकांचे मोबाईल चोरीला गेले आहेत त्यांनी भोसरी एमआयडीसी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी केले आहे.