पिंपरी पालिकेतील स्थायी समिती अध्यक्षपदावर आपल्या समर्थकाला बसवून पालिका तिजोरीच्या चाव्या आपल्या ताब्यात ठेवण्याचे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचे मनसुबे अजित पवार यांनी तूर्त उधळून लावले आहेत. लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर बदलत्या राजकीय समीकरणामुळे अजित पवारांनी स्थानिक नेत्यांवर फार विश्वास न ठेवता स्वत:च निर्णय घेण्याचे व त्याद्वारे स्वत:चे थेट नियंत्रण ठेवण्याचे धोरण पिंपरीत आखले आहे.
आतापर्यंत अजितदादा व नगरसेवक यांच्यात स्थानिक नेत्यांची फळी कार्यरत होती. मधल्या काळातील काही घडामोडींनंतर स्थानिक नेत्यांचा टप्पा अजितदादांनी बाजूला केला आहे. यापुढे त्यांनी थेट कारभार हाती घेण्याचेच सूतोवाच केले आहे. डब्बू आसवानी यांना अध्यक्षपदाची उमेदवारी देऊन अजितदादांनी स्थानिक नेत्यांचे आडाखे चुकवले. राष्ट्रवादीचे सर्व १२ सदस्य अध्यक्षपदासाठी इच्छुक होते. प्रत्येकासाठी कोणीतरी स्थानिक नेता प्रयत्नशील होता. काही दिवसांपासून येनकेनप्रकारेण त्यांनी अजितदादांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न चालवला होता. इच्छुकांच्या या ससेमिऱ्याला अजितदादा कंटाळले होते. उमेदवारी जाहीर होण्याच्या दिवशी ते मुंबईला असल्याची माहिती इच्छुकांना मिळाली, तेव्हा सर्वानी तडकाफडकी मुंबई गाठली. तेथेही इच्छुकांनी मनधरणी सुरू केली होती. तेव्हा, मी आतापर्यंत योग्य उमेदवार दिले आहेत. आताही योग्यच नाव देणार आहे. मला सारखा त्रास दिल्यास सर्व १२ जणांचे अर्ज दाखल करून घेईन, अशी सूचक तंबी त्यांनी दिली. स्थायी सदस्य ठरवताना त्यांनी स्वीय सहायकास पाठवले, त्यावरून बरीच उलटसुलट चर्चा सुरू झाल्याने अध्यक्षपदावेळी अजितदादांनी थेट दूरध्वनी करून आसवानी यांना अर्ज भरण्याचे आदेश दिले. त्यामुळे आपल्या समर्थकाची वर्णी लावण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या बऱ्याच नेत्यांच्या मनसुब्यावर पाणी फिरले. आसवानी यांच्या नियुक्तीचे श्रेय कोणत्याही स्थानिक नेत्याला मिळणार नाही, याची खबरदारी अजितदादांनी आवर्जून घेतल्याचे दिसून येते.