पिंपरी- चिंचवडमधील हिंजवडी येथे उबर कॅब चालकाने संगणक अभियंता महिलेचा विनयभंग केल्याची घटना समोर आली असून याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तुषार बबनराव लांडगे या चालकाला अटक केली आहे. तुषारने कारमध्ये महिलेकडे पाहून अश्लिल इशारे केल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३७ वर्षीय महिला ही बाणेर येथे वास्तव्यास असून त्या हिंजवडीमधील नामांकित कंपनीत संगणक अभियंता म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास चालक तुषार लांडगे हा त्यांना घेण्यासाठी गेला. प्रवासादरम्यान महिलेने कारमध्ये जेवणाचा डबा उघडला आणि त्या खात बसल्या. तुषारने त्या महिलेला कारमध्ये डबा खाण्यापासून रोखले. यावरून दोघांमध्ये शाब्दिक भांडण झाले. त्यानंतर तुषारने आरशातून वाईट नजरेने पाहिले. तसेच अश्लिल इशारेही केले, असे महिलेचे म्हणणे आहे. हिंजवडी वाकड पुलाखाली गाडी आल्यानंतर तुषारने त्या महिलेला कारमधून उतरु दिले नाही. त्याने कार लॉक केली आणि आता तुझी काय अवस्था करतो, अशी धमकी देखील दिली होती, असा आरोप त्या महिलेने केला आहे. शेवटी कारमधून बाहेर पडल्यावर महिलेने थेट पोलीस ठाणे गाठले आणि तुषारविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी तुषारला अटक केली आहे.

हा प्रकार घडल्यानंतर उबर या कंपनीने या संबंधी दिलगिरी व्यक्त केली आहे.

उबरच्या प्रवक्त्यांनी यासंदर्भातला इमेल लोकसत्ता ऑनलाइनला पाठवला आहे. या इमेलमध्ये त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

काय आहे उबरकडून आलेला इमेल?

Uber spokesperson: “We apologize for this rider’s poor experience, and we have removed driver’s access to the app. Our community guidelines clearly reject such inappropriate behaviour, and safety of all our partners is paramount. We stand ready to support the law enforcement authorities in their investigation and proceedings in any way possible.”