कौमार्य चाचणीला विरोध करणाऱ्या ऐश्वर्या भाट-तामचीकरला गरबा खेळण्यास मज्जाव करण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे.
तिचा पती विवेक तामचीकर यानेही पिंपरी येथे घडलेल्या या प्रकाराबाबत फेसबुक पोस्ट लिहून या गोष्टीचा निषेध नोंदवला आहे.
पिंपरी चिंचवडच्या भटनगरमध्ये हा प्रकार घडला. खराडीत राहणारी ऐश्वर्या माहेरी आल्याने भटनगरमधील देवीच्या दर्शनाला गेली होती. तेव्हा ती इतर महिलांसोबत दांडिया खेळू लागली. मात्र मंडळाने हे पाहताच दांडिया खेळ बंद केला आणि डिजे सुरू केला. तिथे असलेले तरूण डिजेवर नाचू लागले. ऐश्वर्या तिथे काही वेळ थांबली होती. मग तिने एका मैत्रिणीला बोलावले, मैत्रिणीला तिथेच थांबवून ती पिंपरी पोलीस चौकीत गेली ऐश्वर्या तिथून गेल्याचं पाहताच दांडिया पुन्हा सुरु झाल्याचे तिच्या मैत्रिणीने तिला कळवलं.

कौमार्य चाचणीला विरोध केल्यानेच मला गरबा खेळू दिला नाही असा आरोप ऐश्वर्याने केला आहे. जानेवारी महिन्यापासून ऐश्वर्या आणि कंजारभाट समाजातील इतर तरूण-तरूणींना कौमार्य चाचणीला विरोध दर्शवला आहे. एवढेच नाही तर सोशल मीडियावर Stop The V Ritual या नावाने ग्रुप तयार करून हे तरूण-तरूणी एकवटलेत.
”पिंपरीतील कंजारभाट समाजातील गुंडांनी पुन्हा एकदा पुरुषार्थ दाखवून दिला. निषेध! निषेध! निषेध! माझ्या पत्नीने या जात गुंडांच्या कौमार्यपरिक्षणाच्या अमानुष प्रथेविरोधात हिंमतीने लढा दिला म्हणून तिला दांडिया, गरबा खेळण्यास मनाई करून बहिष्काराचं कृत्य करण्यात आलंय, कौमार्य परिक्षण करणाऱ्यांनी नवरात्रीत देवीची पूजा करणे हे निव्वळ ढोंग आहे.” अशी फेसबुक पोस्ट ऐश्वर्याचा पती विवेक तामचीकर याने लिहिली आहे.