निर्णय प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हाती

भाजपच्या पिंपरी – चिंचवड शहराध्यक्षपदासाठी सुरू असलेली रस्सीखेच आणि वाढलेली इच्छुकांची संख्या यामुळे पक्षश्रेष्ठींसमोर पेच निर्माण झाला आहे. आगामी पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सामना करू शकेल, अशा नेतृत्वाचा शोध पक्षात सुरू आहे. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी प्रमुखांची मते जाणून घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील शहरात येणार आहेत.

पिंपरी शहराध्यक्षपदाचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. विद्यमान शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप पुन्हा अध्यक्ष होण्यास उत्सुक नाहीत. तशीच भूमिका दुसरे आमदार महेश लांडगे यांनीही घेतली आहे.  शहराध्यक्षपदासाठी ११ जण इच्छुक आहेत. स्थानिक पातळीवर कोणत्याही नावावर एकमत होत नसल्याने स्वत: प्रदेशाध्यक्ष शहरात येणार असून ते प्रमुखांना भेटणार आहेत. सर्वाची मते जाणून घेतल्यानंतर ते नव्या शहराध्यक्षाची घोषणा करतील, असे पक्षाकडून सांगण्यात आले. िपपरी प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, लोकलेखा समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. सचिन पटवर्धन, पक्षनेते एकनाथ पवार, माजी नगरसेवक उमा खापरे, राजू दुर्गे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात अशी चर्चेतील प्रमुख नावे आहेत. महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शहराध्यक्षपदाची निवड केली जाणार आहे. त्यादृष्टीने आमदार जगताप वा लांडगे यांनी हे पद स्वीकारावे, असा मतप्रवाह पक्षात आहे.

मंडलाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. ४ ठिकाणी मंडलाध्यक्षांची निवड होणे बाकी आहे. ती झाल्यानंतर शहराध्यक्षपदाची निवड होईल. तत्पूर्वी, प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील शहरात येणार आहेत. – प्रमोद निसळ, निवडणूक निर्णय अधिकारी