पिंपरी-चिंचवड शहरात करोना बाधितांचा आकडा वाढत असताना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयातील पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारीऱ्यांनाही करोनाची लागण झाली आहे. बुधवारी दिवसभरात ११ कर्मचारी आणि अधिकारी हे करोना पॉजिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर विविध खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत आयुक्तालयातील २८ पोलिसांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

दोन दिवसांपूर्वीच पोलीस आयुक्तालयातील दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर, बुधवारी ११ जणांना करोनाची बाधा झाल्याचं आढळलं आहे. ही संख्या अधिक वाढण्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली असून संबंधित पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या इतर जणांना क्वारांटाइन करण्यात आले आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेदेखील करोनाची चाचणी केली असून त्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.

सध्या आयुक्तालयातील एकूण करोना बाधितांची संख्या २८ झाली असून त्यापैकी, १५ जण बरे झाले आहेत. तसंच त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. त्यातील १२ जण हे कर्तव्यावर रुजूदेखील झाले आहेत. तर १३ जणांवर विविध खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी महिती एका पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.