पडून असलेल्या रोपांची विद्यापीठाकडे माहिती नाही

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एकाच प्रकारच्या रोपांचे वाटप करण्यासाठी केलेल्या उपक्रमाची ‘गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड्स’ने दखल घेतली आहे. कडुनिंबाची १६ हजार ६६१ रोपे एकाच वेळी वाटप करण्याचा विश्वविक्रम झाल्याची नोंद गिनेस बुकने संकेतस्थळावर नमूद केली आहे. दरम्यान विद्यापीठात पडून असलेली रोपे कुठली आणि त्याचे रोपण का केलेले नाही, याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडे नाही.

विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे ‘स्वच्छ वारी, सुंदर वारी, निर्मल वारी, हरित वारी’ या उपक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत कडुनिंबाच्या रोपांचे २३ जूनला विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी ‘गिनेस’चे प्रतिनिधीही उपस्थित होते. त्यांच्या निकषांनुसारच कार्यक्रमात रोपांचे वाटप करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी तीन कोटी ४० लाखांची तरतूद करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना वाटण्यात आलेली रोपे वारी मार्ग आणि परिसरात लावली जाणार असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले होते. मात्र, विद्यापीठात अनेक रोपे पडून असल्याचे आणि त्यातील काही रोपे जळून गेल्याचे आढळून आले आहे.

रोपे वाटपाच्या उपक्रमात विद्यार्थ्यांना देण्यात आलेली, किंबहुना त्याहून जास्त रोपे लावण्यात आली असल्याचा दावा विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आला. मात्र, विद्यापीठाच्या परिसरात पडून असलेली रोपे कुठली, ही रोपे विश्वविक्रम उपक्रमातील होती का आणि त्याची आतापर्यंत लागवड का करण्यात आली नाही, याचे स्पष्टीकरण विद्यापीठ प्रशासनाला देता आले नाही.

पहिलेच विद्यापीठ आणि विक्रमाचा आनंदही

‘विक्रम करण्याच्या हेतूने उपक्रम राबवण्यात आला नाही. मात्र, उपक्रमातून विक्रम झाला याचा आनंद आहे. यामुळे समाजात पर्यावरण संवर्धनाची जागृती निर्माण होईल. या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व घटकांचे अभिनंदन करतो,’ असे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले. तर व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे म्हणाले, की असा विक्रम करणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशातील पहिलेच विद्यापीठ ठरले आहे. या विक्रमामुळे राष्ट्रीय सेवा योजनेचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर गेले आहे.