News Flash

रौप्य महोत्सव.. वृक्षांचा!

मीरा आनंद परिसरातील रहिवाशांनी तब्बल १५०० झाडे लावून ती पंचवीस वर्षे जगवून दाखवली आहेत. १९८९ मध्ये केलेल्या वृक्षारोपणाचा रौप्य महोत्सव देखील हे रहिवासी साजरा करणार

| September 25, 2014 03:25 am

वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर लावलेल्या वृक्षांचे पुढे काय झाले, याचा बहुदा विसरच पडलेला दिसतो. पण मीरा आनंद परिसरातील रहिवाशांनी तब्बल १५०० झाडे लावून ती पंचवीस वर्षे जगवून दाखवली आहेत. १९८९ मध्ये केलेल्या वृक्षारोपणाचा रौप्य महोत्सव देखील हे रहिवासी साजरा करणार आहेत.
मीरा-आनंद परिसर निवासी संघाचे पंडितराव पाटील आणि किरण शेटे यांनी ही माहिती दिली. या परिसरात २९ सोसायटय़ा आहेत. १९८९ मध्ये या सोसायटय़ांनी कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्या सल्ल्याने परिसरात एकाच दिवशी १५०० झाडे लावली होती. कडुनिंब, रेन ट्री, गुलमोहर, कॅशिआ चेरीज, सिल्व्हर ओक, बॉटल ब्रश, रबर ट्री अशा विविध वृक्षांचा यात समावेश होता. आता हे सर्व वृक्ष उंच आणि डेरेदार झाले आहेत. झाडे जगवण्यासाठी येथील रहिवाशांनी स्वत: त्यांची निगा राखली, तसेच पालिकेच्या उद्यान विभागाचेही सहकार्य घेतले. आता या वृक्षांना २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांचा रौप्य महोत्सव साजरा करण्याचे रहिवासी संघाने ठरवले आहे.
वृक्षारोपणाच्या वेळी उपस्थित असलेले तत्कालीन महसूल आयुक्त अरुण बोंगिरवार, डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, पत्रकार नंदकुमार सुतार या वेळी उपस्थित राहणार आहेत. ज्यांनी-ज्यांनी २५ वर्षांपूर्वी वृक्षारोपणात भाग घेतला होता, त्यांचा आणि परिसरातील वयाची ८० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. २७ सप्टेंबरला सायंकाळी ५ ते ७ या वेळात मीरा सोसायटीतील रावसाहेब पटवर्धन सभागृहात हा कार्यक्रम होईल. या वेळी २९ सोसायटय़ांना प्रत्येकी एक कडुनिंबाचे रोप देण्यात येणार आहे. सोसायटय़ांनी ते झाडही जगवावे व वाढवावे, अशी कल्पना असल्याचे पाटील आणि शेटे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2014 3:25 am

Web Title: plantation silver jubilee meera anand society
टॅग : Silver Jubilee
Next Stories
1 दोन आठवडय़ानंतरही मोहिनी लांडेच महापौर
2 गवंडीही जाणार आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत!
3 मंगळयान मोहिमेचे यश शहरात जल्लोषात साजरे!
Just Now!
X